कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा निर्णय; मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार…
कुडाळ
जिल्ह्यात सोशल मिडिया व युट्युबचे काम करणाऱ्या पत्रकारांना चिपी विमानतळाच्या उद्घाटनाचे प्रवेश पास देण्यास जिल्हा प्रशासनाकडून टाळाटाळ सुरू आहे. त्यामुळे ९ ऑक्टोंबर रोजी होणाऱ्या उद्घाटनाच्या कार्यक्रमास बहिष्कार घालण्याचा निर्णय सोशल मीडिया पत्रकारांकडून घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांना काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात येणार आहे, असा इशारा महाराष्ट्र मराठी पत्रकार जिल्हा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. आज आंजिवडे घाटरस्ता पाहणीसाठी आलेल्या खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्याकडे जिल्हातील सर्व युटयुब, सोशल मिडिया पत्रकारांनी माणगाव येथे भेट घेऊन निवेदन देत आपली नाराजी व्यक्त केली. यावेळी खासदार राऊत यांनी फक्त ३५ पत्रकारांनाच त्या ठीकाणी प्रवेश देण्यात येणार आहे. यातील मुंबई-सिंधुदुर्ग येथील ७० पत्रकारांची यादी आली आहे. त्यातील ३५ पत्रकारांना प्रवेश देण्यात येणार आहे. त्यावेळी जिल्ह्यातील पत्रकारांच्या गर्दीमुळे कोरोनाचा प्रार्दुभाव होणार आहे का? यावेळी पक्षांच्या कार्यकर्त्यांची गर्दी होणार नाही का? या कार्यक्रमाला कोरोनाच्या सर्व अटी शर्तीचे पालन केले जाणार आहे का? यावेळी खासदारांनी जिल्ह्यामध्ये ३५० पत्रकार असल्याचे उल्लेख केला आहे. जर युटुब, सोशल मिडिया पत्रकारांना प्रवेश नाही असे त्यांचे म्हणणे असेल तर काही युटुब, सोशल मिडिया पत्रकारांना प्रवेश कार्ड कशी देण्यात आली? असा सवाल समिती पदाधिकाऱ्यांकडून उपस्थित करण्यात आला आहे.