राजकिय विशेष….
सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकेकाळी काँग्रेसचे वर्चस्व होते, परंतु जसजशी परिस्थिती बदलत गेली तसे नवे वारे वाहू लागले. शिडाच्या होड्या धक्क्याला लागून इंजिनच्या बोटी सुरू झाल्या तसेच मतदारांनी बाळासाहेब ठाकरेंच्या घणाघाती विचारांनी प्रज्वलित झालेल्या शिवसेनेला स्वीकारलं आणि जिल्हा भगवामय झाला. कालांतराने नारायण राणे काँग्रेसमध्ये आले आणि काँग्रेसला सुगीचे दिवस दिसले. परंतु राणे राज्य पातळीवर असताना जिल्ह्यातील कोणा नेत्याला, अगदी जिल्हाध्यक्षांना देखील प्रदेश पातळीवर ओळख नसायची, किंबहुना त्यांना प्रदेश पर्यंत पोचायला देखील दिले जात नव्हते. राणे कॉंग्रेसमधून बाहेर गेल्यावर काही काळात सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली सारख्या छोट्याशा गावातील नारायण राणे यांचेच जुने शिलेदार चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांच्याकडे जिल्हा काँग्रेसचे नेतृत्व आले. आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने करत बाळा गावडे यांनी थेट प्रदेशवर आपली छाप पाडत स्वतःचे वजन निर्माण करत आपले नेतृत्व सिद्ध केले.
सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून प्रदेशवर आपले वजन दाखवून नेतृत्व सिद्ध करणारे बाळा गावडे हे पहिलेच जिल्हाध्यक्ष. आपल्या जिल्हाध्यक्षपदाच्या कारकिर्दीत जिल्हा काँग्रेसला बळकटी आणत जिल्ह्यात काँग्रेस पुन्हा एकदा उभी केली. बाळा गावडे यांचे सर्वसमावेशक नेतृत्व, साधी राहणी, आणि बोलण्यातला चांगुलपणा पाहून राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते देखील त्यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत काँग्रेसमध्ये प्रवेशकर्ते झाले. प्रदेश काँग्रेसने याची दखल घेत जिल्हाध्यक्षांना निमंत्रण दिले व प्रदेशाध्यक्षांचा उपस्थितीत राष्ट्रवादीकडून काँग्रेसमध्ये आलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा यथोचित सन्मान करत प्रवेश घडविला. त्याचबरोबर बाळा गावडे यांच्या नेतृत्वाचा सन्मान करत त्यांनाही भविष्यात चांगले काम करण्यासाठी प्रोत्साहित केले. प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्यस्तरीय एकही नेता जिल्ह्यात नसताना जिल्ह्यातील काँग्रेस नेतृत्वाची दखल घेतल्याने बाळा गावडे यांच्या नेतृत्वाचे वजन प्रदेशावर अधोरेखित झाले.
नारायण राणे काँग्रेसमध्ये असताना जिल्हाध्यक्ष हे राणेंच्या नेतृत्वात काम करत होते, त्यांना इतर कोणत्याही नेत्याला भेटण्याची अथवा मंत्रालयात देखील जाण्याची संधी मिळत नव्हती. पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाची सुरुवात आणि शेवट म्हणजे राणे हेच असायचे. त्यामुळे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते यांना स्वतःचे नेतृत्व सिद्ध करण्याची संधी मिळत नव्हती. जिल्ह्यात पोखरलेली, हेवेदावे असणारी, एकमेकांवर कुरघोडी करत झगडत असणारी काँग्रेस बाळा गावडे यांनी एकसंध केली. अंतर्गत वादापेक्षा पक्ष शिस्त आणि पक्षवाढ हेच ध्येय्य नजरेसमोर ठेवत बाळा गावडे यांनी पक्षबांधणी केली. त्यामुळे बाळा गावडे यांच्यात उपजत असलेल्या गुणांची प्रदेश पातळीवरून पारख झाली, म्हणून दिल्लीतून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अधिकृत जिल्हाध्यक्ष म्हणून बाळा गावडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होत नियुक्तीपत्र देण्यात आले.
सावंतवाडीतील इन्सुली या छोट्याशा गावातील कार्यकर्ता पंचायत समिती सदस्य, सभापती, जि प सदस्य, सभापती होत पुढे काँग्रेस तालुकाध्यक्ष ते जिल्हाध्यक्ष असा प्रवास करणारे बाळा गावडे यांनी आज प्रदेश काँग्रेसमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करत आपले वजन आणि नेतृत्व प्रदेशवर सिद्ध केले आहे. भविष्यात प्रदेशच्या आशीर्वादाने जिल्ह्यात काँग्रेसला सुगीचे दिवस येतील यात शंकाच नाही.