एस. टी. च्या करारानुसार स्थानकांतील दुकाने सुरू ठेवणे बंधनकारक
कणकवली
कोल्हापूरसह राज्यातील काही शहरामध्ये सद्या जनता कर्फ्यु लागू करण्यात आला आहे. त्याचबरोबर एस. टी. ची वाहतूक आता १०० टक्के प्रवासी क्षमतेने सुरू झाली आहे. मात्र या कर्फ्युमुळे बस स्थानकांतील बहुसंख्य आस्थापना (दुकाने) बंद असल्याने चालक-वाहकांसह प्रवाशांवर उपासमारीची वेळ आली आहे. एस. टी. च्या करारानुसार कर्मचाऱ्यांसह प्रवाशांच्या सेवेसाठी ही दुकाने चालू ठेवणे बंधनकारक आहे. शक्य असलेल्या परवानधारक दुकानधारकांनी आपली दुकाने चालू ठेऊन उपासमारीची ही अडचण दूर करत्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन एस. टी. कँन्टिन व स्टाँलधारक असोशियनचे बिड येथील अध्यक्ष राम हरल आणि कणकवलीचे उपाध्यक्ष गणपत तथा भाई चव्हाण यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
एस. टी. ची सेवा १०० टक्के प्रवासी क्षमत्तेने सुरू असली तरीही अद्याप १५ ते २० टक्के प्रवासी या सेवेचा लाभ घेत आहेत. त्यामुळे व्यवसाय नसल्याने बऱ्याच स्थानकांतील दुकानदारांना आपली दुकाने बंद ठेवणे भाग पडले आहे. परिणामी प्रामुख्याने चालक-वाहकांना चहा सुद्धा मिळणे कठीण झाले आहे. उपाशीपोटी गाड्या चालविणे म्हणजे अपघाताला आमंत्रण देण्यासारखे आहे. रक्तदाब, मधुमेही रुग्णांना तर हे धोकादायक आहे, असे स्पष्ट करून या पत्रकात ज्या कँन्टिन व स्टाँलधारकांना शक्य असेल त्यांनी अशा परिस्थितीत नफा-तोट्याचा विचार न करता मानवतेच्या भावनेतून आपली दुकाने सुरू करावीत. स्थानिक स्वराज्य संस्थांसह प्रशासनाने त्यांना सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.