जागतिक मराठी “साहित्य कला व्यक्ती” विकास मंचच्या सदस्या, विविध पुरस्कार प्राप्त जेष्ठ कवयित्री प्रा.सौ. सुमती पवार यांची काव्यरचना
क्षणा क्षणाचे सारे सोबती घेऊन जाऊ काय आम्ही
आता आहे उद्याची पण सांगा आहे का हो हमी?
पानावरचे दंवबिंदू हो, सरसर मोती गळतात
वर्ष महिने दिवस सारे भरभरभरभर पळतात ….
हे माझे हो ते माझे हो कवटाळून बसती सारे
कसे अचानक कुठून येती वावटळी अन् हे वारे
पाचोळा जणू उडून गेला पहा चालता बोलता
आता माझे बाळ होते गळून गेले म्हणे लता..
पारच झाली माती पहाना उजाडले हो संसार
घार होऊनी जपले ज्यांनी झाली जीवनी हो हार
पाणी शिंपले किती तयांनी लावून बाजी जीवाची
ह्याची देही ह्याची डोळा करून टाकली ना गोची…
कुठे मुले तर माय बाप हो विरळ झाले सामोरे
भकास झाले चेहरे त्यांचे फिरून गेले हो वारे
नको कुणावर वेळ अशी हो शत्रूवर ही ना येवो
मीठ भाकरी घराघरातून हरएक सुखाने तो खावो..
म्हणून सांगते सुहृदांनो हो विसरून जा हेवेदावे
नाही भरवसा पहा क्षणाचा आनंदाने जगावे
नको कटकटी नको भांडणे जगा जगा हो जगा जगा
काळ कधी हा देईल धोका त्याचा भरवसा धरू नका..
गेल्यावरती रडण्यापरी हो, प्रेमच आता ओसांडो
घराघरातून जनता आता सारी सुखाने च नांदो
सारे सोडून आहे जायचे, उपभोगा अन् वाटा हो
नको कुणाच्या मनी सल अन् नकोच पायी काटा हो …
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)