You are currently viewing जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय वाढीसाठी महासंघाला आवश्यक ते सहकार्य करू

जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय वाढीसाठी महासंघाला आवश्यक ते सहकार्य करू

सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांचे प्रतिपादन

मालवण

पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जी पर्यटन स्थळे आहेत, त्या पर्यटन स्थळांची माहिती देशी विदेशी पर्यटकांना देण्यासाठी पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या कार्यात खांद्याला खांदा लावून आपण काम करू व जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय वाढीसाठी महासंघाला आवश्यक ते सहकार्य करू असे प्रतिपादन सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांनी येथे  केले. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या वतीने जागतिक पर्यटन दिनानिमित्त पर्यटन दिन कार्यक्रमाचे आयोजन मालवण कोळंब येथील समर्थ हॉल मध्ये आयोजित करण्यात आला होता. त्याचे उद्घाटन सावंतवाडी संस्थान चे युवराज लखमराजे सावंत भोसले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली, मनसेचे नेते माजी आमदार परशुराम उपरकर, महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर, जिल्हा बँकेचे संचालक व्हिक्टर डान्टस, मालवणचे सभापती अजिंक्य पाताडे, नकुल पार्सेकर, सतीश पाटणकर, जिल्हा व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर, महासंघाचे तालुकाध्यक्ष अविनाश सामंत, महिला आघाडीच्या मेघा सावंत, कोळंब सरपंच प्रतिमा भोजने, पत्रकार प्रफुल्ल देसाई, मंगेश जावकर,किशोर दाभोलकर, शेखर गाड , पूनम चव्हाण आदी व इतर उपस्थित होते.

राजन तेली म्हणाले, आज होणाऱ्या विकास प्रकल्पांची मोठेपणा घेण्यासाठी राजकीय भांडणे होत आहेत. यामध्ये जिल्ह्याचा विकास मागे पडत आहे. जिल्ह्यात पर्यटन विकासाला मोठा वाव असून यासाठी सर्व राजकीय लोकांनी एकजूट ठेवून काम केले पाहिजे. मात्र जिल्ह्यातील राजकीय लोक एकत्र येत नाही हे जिल्ह्याचे दुर्दैव आहे. पर्यटन विकासासाठी राज्यकर्त्यांची व अधिकाऱ्यांची मानसिकताही बदलली पाहिजे, असेही राजन तेली म्हणाले.

परशुराम उपरकर म्हणाले, पर्यटनाच्या बाबतीत सर्व दृष्टीने सिंधुदुर्ग सुजलाम सुफलाम जिल्हा आहे. जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिकांना एकत्र आणणे महत्वाचे आहे. पर्यटन पॉलिसी तयार करून पर्यटन व्यावसायिकांना अनुदान देऊन पर्यटन विकसासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. राजकारण विरहित पर्यटन निर्माण झाल्यास जिल्ह्याचा विकास साधला जाईल असेही उपरकर म्हणाले. यावेळी बाबा मोंडकर म्हणाले, जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय हा स्थानिकांनी उभा केला आहे. मात्र मूलभूत सुविधांचा अभाव असून त्या सरकारने निर्माण करून दिल्या पाहिजेत. गेल्या दीड वर्षात सिंधुदुर्गातील पर्यटन व्यावसायिक कोरोना मुळे होरपळला आहे. पर्यटन विकसासाठी शासनाकडून निधी आला पाहिजे. क्लिष्ट कायदे, जमीन व वन विभागातील नियम यात जिल्हा अडकला असून यामुळे पर्यटन विकास होणार कसा असा सवालही बाबा मोंडकर यांनी उपस्थित केला. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा तसेच महासंघाने घेतलेल्या प्रशिक्षण शिबिरातील प्रशिक्षणार्थी चा महासंघातर्फे प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित पर्यटन व्यावसायिकांनीही आपले विचार मांडले. सूत्रसंचालन नकुल पार्सेकर यांनी केले. तर आभार गुरुनाथ राणे यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा