तळेरे : प्रतिनिधी
गोंधळी समाजातील शशिकांत इंगळे यांची भटके विमुक्त हक्क परिषद सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष धनंजय ओंबासे व प्रदेश कार्यकारिणीने निवड केली आहे. पुढील 3 वर्षांसाठी ही नियुक्ती असल्याचे नियुक्तीपत्रात म्हटले आहे. शशिकांत इंगळे हे गोंधळी समाजाच्या उत्कर्षाससाठी झटणारे कार्यकर्ते असून भटक्या विमुक्त जमातीसाठी सक्रीय राहून कार्य करीत आहेत. महाराष्ट्र प्रदेश पातळीवर यांच्या कार्याची दखल घेत भटके विमुक्त हक्क परिषद महाराष्ट्र या भटके विमुक्त जाती जनजाती( ५१ जनजाती) साठी सामाजिक कार्य करणाऱ्या संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष पदी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री.धनंजय ओंबासे, महाराष्ट्र प्रदेश सचिव प्राध्यापक श्री.सखाराम धुमाळ , प्रदेश मुख्य संघटक श्री पुरुषोत्तम काळे व सर्व कोअर टीमचे सदस्य यांच्या नेतृत्वाखाली नेमणूक करण्यात आली आहे
महाराष्ट्रामध्ये भटके विमुक्त हक्क परिषद ही विजेएनटी (अ.ब.क.ड) म्हणजेच ५१ जाती जमातीसाठी काम करणारी एकमेव संघटना आहे. या हक्क परिषदेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संपूर्ण भटक्या जमातीला एकत्रीत आणून संघटनेच्या ध्येय धोरणानुसार काम करून शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्याचा आपण प्रयत्न इंगळे करणार आहेत.तसेच समाजाच्या सामुहिक प्रश्नांना देखील न्याय मिळवून देण्याचे प्रयत्न या संघटनेच्या माध्यमातून केले जातील. भटके विमुक्त हक्क परिषद गेल्या अनेक वर्षांपासून जातीच्या दाखल्याचा मोठ्या प्रमाणात प्रलंबित असणारा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असून त्या करीता वेळो वेळी त्याचा शासनदरबारी पाठपुरावा करून 2008 चा जीआर पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न हक्क परिषद करत आहे .याबाबत बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ग्रीन सिग्नल दिलेला असून तो जीआर पुनर्जीवित झाला तर भटके विमुक्त समाजासाठी असणाऱ्या सर्व शासकीय योजनाचा भटक्या जमातीतील विद्यार्थ्यांना व समाज बांधवांना लाभ मिळेल व हा भटका समाज विकासाच्या मुळ प्रवाहात येऊ शकेल .
अशा अनेक विषयांवर हक्क परिषद महाराष्ट्रात काम करीत आहे.असेच कार्य सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भटक्या जमातीतील समाज बांधवासाठी हक्क परिषदेच्या माध्यमातून केले जाईल. येत्या काही दिवसांत भटके विमुक्त हक्क परिषद सिंधुदुर्ग कार्यकारीणीची निवड करण्यात येणार असल्याचे नूतन जिल्हाध्यक्ष इंगळे यांनी प्रसिद्धीपत्रकातून म्हटले आहे.
फोटो:-
शशिकांत इंगळे