*गद्धेपुराण…..*
गधा कहीं का ..
गाढव आहेस नुसता …
किती हिणवता हो गुणवंताला … हो, मी विचार करूनच
बोलते आहे..जरा बघा त्या गाढवा कडे ! खाली मान घालून
उभा असतो, एखाद्या आज्ञाधारक मुला सारखा …!
मुला सारखा … चुकलेच मी .. हो, हल्ली मुलं आज्ञा पाळतात …? विचारा स्वत:च्या मनाला . नाही हो .. सारखं रागवावं
लागतं हल्ली मुलांना..त्या शिवाय कानात शिरतच नाही त्यांच्या…?
खरोखर देवाने .. अत्यंत विचारपूर्वक गाढवाची निर्मिती केली
आहे … अहो , त्यातले अवगुण मला शोधून दाखवा ना …?
एक ही सापडणार नाही … आणि गुण … ?
अबबबबबबबब……! शिवाय त्यांचा काही ही त्रास नाही… ! ते वेगळेच …
1. तो अत्यंत आज्ञाधारक आहे.
2. मालकाचे सर्व काही तो ऐकतो.
3. तो अत्यंत विश्वासू आहे.
4. मालकावर तो जीवापाड प्रेम करतो.
5. मालक पोसत नाही तरी तो तक्रार करत नाही.
6. कुणाही जवळ चुगली चहाडी, निंदा करत नाही.
7. मालक त्याच्या जेवणाची जबाबदारी घेत नाही.
8. तो कधी ही मालकावर उलटत नाही , हल्ला करत नाही.
9. मालकाच्या हुकुमा नुसार वाट्टेल तेवढे काम करतो.
10. त्याने स्वत: हून हल्ला केल्याचे एक ही उदा. नाही.
11. त्याला स्वच्छ पाणी लागते प्यायला, तो स्वत: ते शोधतो.
12. पाण्याची ही अपेक्षा तो मालकाकडून करत नाही.
13. अतिशय जड ओझी तो विनातक्रार वाहतो.
14. त्याच्या कष्टांवर अनेकांचे संसार चालतात , पोटे भरतात पण तो कधी ही उपकार केल्याचे दाखवत नाही. की त्याची जाहिरात ही करत नाही.
15. तो अतिशय नि:स्पृह आहे. काही ही मागत नाही की घेत ही नाही.
16. स्वत:चा चरितार्थ स्वत: चालवितो .
17. कोणी छेड काढल्यावरच तो जन्माची अद्दल घडवतो ,म्हणून सहसा कुणी त्याच्या वाट्याला जात नाही.
18. तो मालकाच्या अंगणात वाट पाहत उभाच असतो.
19. तो उभ्याउभ्याच विश्रांती घेतो ती ही मिळाली तरच..
20. त्याच्या सारखा कष्टाळू, प्रामाणिक, आज्ञाधारक सेवक शोधूनही सापडणार नाही.
खरं सांगा …
इतका गुणसंपन्न प्राणी आणखी कोण आहे…त्याला अनुसरले
तर .. जगात एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही.. आणि आपण खुशाल उचलतो जीभ नि लावतो टाळ्याला ..म्हणे
ए.. गाढवा.. गाढवाला हिणवतांना आपण स्वत: कडे एकदा
निरखून पहायला हवे की , आपण गाढव म्हणायच्या लायकीचे
आहोत का? माणसाला गाढवाची उपमा देऊन त्याचा अपमान करायचा
अधिकार आपल्याला कुणी दिला..? निदान गाढवा सारखे
होण्याचा प्रयत्न तरी आपण केला पाहिजे.. म्हणजे गाढवाचे
कष्ट थोडे कमी होऊन आपली वाढलेली चरबी कमी होऊन
आपण त्याच्या सारखे फिट्ट होऊन आपले आयुर्मान वाढून
हार्टॲटॅक सारखे आजार नक्कीच आपली पाठ सोडून पळून
जातील. म्हणून आपण साऱ्यांनी गाढवाचा आदर्श डोळ्या
समोर ठेवून तसे वागण्याचा निश्चय केला पाहिजे व त्याची
हेटाळणी ताबडतोब बंद केली पाहिजे ..
अन्यथा , गाढव मंडळी कोर्टात गेल्याशिवाय राहणार नाहीत .
मी तर म्हणते, त्यांनी कोर्टात जावेच , व आपल्या मागण्या मंजूर करून घ्याव्यात . पण त्या होतीलच कशा हो..
कोर्टातही बाजू मांडायला गाढवासारखी शहाणी माणसे
आहेत कुठे…
त्यामुळे गाढवांनी माणसांना ट्रेनिंग दिल्याशिवाय गाढवांना
सध्यातरी न्याय मिळण्याची शक्यता नाही असे दिसते…
म्हणतात ना ..” ठेविले अनंते तैसेची रहावे”सध्या तरी…
प्रा. सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)