आमदार वैभव नाईक यांनी स्पष्ट स्वरुपात मांडली भूमिका
खड्डेमय बनलेल्या मालवण तालुक्यातील ९ प्रमुख रस्त्यांच्या कामांना मंजुरी
दसऱ्यानंतर रस्त्यांच्या कामांना प्रत्यक्ष सुरवात होणार असल्याचे सांगत मंजूर कामांची यादी केली सादर
मालवण-कुडाळ तालुक्यातील अनेक रस्ते खड्डेमय बनले आहेत. ही वस्तुस्थिती आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे जनता व वाहन चालक यांना त्रास होत आहे. राजकीय आरोपही केले जात आहेत. मात्र रस्त्यांची जबाबदारी माझीच आहे. हे रस्ते मे, जून महिन्यातच मंजूर करून घेतले आहेत. पावसाळा असल्यामुळे रस्त्यांची कामे सुरू झाली नाहीत. मात्र दसऱ्या नंतर रस्त्यांच्या कामाला सुरुवात केली जाईल. चौके कुडाळ, कांदळगाव मसुरे या प्रमुख रस्त्यांसह तालुक्यातील ९ रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. तर कुडाळ तालुक्यातील १४ रस्ते कामांना मंजुरी मिळाली आहे. अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी मालवण शिवसेना शाखा येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत गेल्या दोन वर्षांत झालेल्या कामांपैकी १०० कोटींचे बिले ठेकेदारांची देणे आहेत. यासाठी बांधकाम मंत्री व अर्थ मंत्री यांच्याकडे पाठपुरावा सुरू असून लवकरच निधी मंजूर होईल अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.
यावेळी शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपतालुकप्रमुख गणेश कुडाळकर, बांधकाम सभापती मंदार केणी, नगरसेविका सेजल परब, पंकज सादये, तपस्वी मयेकर, उमेश मांजरेकर यासह शिवसैनिक उपस्थित होते.