संपादकीय….
कोकणात पावसाळ्यात आल्हाददायक वातावरण असतं, कित्येकदा धो धो कोसळणारा पाऊस आणि अधूनमधून पावसाची रिपरिप ही सुरूच असते. त्यामुळे भातशेती विपुल प्रमाणात केली जाते. डोंगर उताराचा प्रदेश असल्याने बरेचसे पाणी समुद्राकडे वाहून जाते. परंतु विपुल प्रमाणात असलेल्या पावसामुळे पाण्याची कमी नसते. दरवर्षी जून महिन्यात मृग नक्षत्राला सुरू होणारा पाऊस यावर्षी मात्र १५ मे रोजी तौक्ते वादळासोबत आला तो आजपर्यंत सुरूच आहे. गेल्या चार महिन्यात एखाद दुसरा दिवस वगळता सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने उसंत घेतलीच नाही. गणेशोत्सव कालावधीत काही ठिकाणी पावसाने ऊन दाखवले होते, म्हणावा तसा विसावा मात्र घेतला नाही.
गणेशोत्सव नंतर पावसाने ऊन पावसाचा खेळ सुरू केला आणि पुन्हा एकदा पावसाला जोर चढला. गेल्या दोन तीन दिवसात तर सर्वत्र पाऊस सुरू झाला असून वातावरण अचानक थंड झालं, हवेत गारवा निर्माण झाला. निसर्गाच्या लहरीपणामुळे कोरोनाचा कहर कमी होतो न होतो तोवर सर्दी तापाचे रुग्ण सर्वत्र आढळू लागले. सर्दी ताप साथ सुरू झाल्याने लोकांच्या मनात कोरोनाची भीती मात्र नव्याने उभी राहू लागली. परंतु गाव, शहरातील दवाखाने आणि औषधी दुकानातून सर्दी तापावर औषधे घेण्यावरच लोकांचा कल दिसून येत आहे. बऱ्याच लोकांचे कोरोना साठीचे पहिले तर काहींचे दोन्ही डोस पूर्ण झाल्यामुळे अनेकांच्या मनातील भीती नाहीशी झाली आहे.
मुंबईकर आल्यानंतर जिल्ह्यात कोरोनाची साथ वाढणार अशी असलेली भीती काहीशी कमी झाली आहे, अगदी कोरोना बाबतही लोकांच्या मनातील भीती कमी झाली परंतु अचानक पावसाच्या लहरीपणामुळे, उष्ण-थंड होणाऱ्या हवामानामुळे जिथे पहावे तिथे सर्दी तापाचे रुग्ण दिसू लागले. त्यातून जर कोणी खरोखरच कोरोना रुग्ण असले तर मात्र ते धोक्याचे ठरणारे आहे. त्यामुळे लोकांनी सर्दी-ताप बाबतही सावधानी घेणे आवश्यक आहे. हयगय न करता योग्यवेळी उपचार घेणे हाच सर्दी तापावर रामबाण उपाय आहे.
जिल्ह्यात अति प्रमाणात होणाऱ्या पावसामुळे हाता तोंडाशी आलेली भातशेती मात्र जमीनदोस्त होत आहे. कित्येक ठिकाणी चांगले पिकलेले पीक आडवे होऊन पाण्यात पडल्याने भाताला पुन्हा कोंब येण्याची भीती आहे, त्यामुळे सध्या सुरू असलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची भीती आहे. दरवर्षी ऐनवेळी भात पीक पिकण्याची सुरुवात असते, भात कापणी हंगाम जवळ येतो, तेव्हाच कोसळणाऱ्या लहरी पावसाने होणाऱ्या नुकसानीमुळे अनेक शेतकऱ्यांनी शेती न करण्याकडे भर दिला, त्यामुळे शेतीयोग्य जमीन ओसाड पडलेली पहायला मिळते. पाऊस चांगला असतानाही भात पिकाची होत असलेली नुकसानी, वाया जाणारे कष्ट यामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेतीकडे पाठ फिरवल्याचे दृश्य दिसत आहे. त्यामुळे रस्त्याच्या कडांना भाताच्या लोम्बीनी डुलणारे भाताचे मळे आज दिसेनासे झाले आहेत.