You are currently viewing सुट्टीतल एमपीएड अभ्यासक्रम चालू करणार – कुलगुरू डॉ के. वायुनंदन

सुट्टीतल एमपीएड अभ्यासक्रम चालू करणार – कुलगुरू डॉ के. वायुनंदन

तळेरे

शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या शारीरिक शिक्षकांना बी.एड प्रमाणे शैक्षणिक अर्हता वाढविता यावी म्हणून एमपीएड हा सुट्टीतील बहि:स्थ अभ्यासक्रम यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठा मार्फत सुरु करण्यात यावा अशी मागणी क्रीडा भारती तसेच महाराष्ट्र राज्य क्रीडा शिक्षक महासंघ, अहमदनगर व राज्य समन्वय समिती यांचे वतीने विद्यापीठाचे कुलगुरुंकडे केली असता, एमपीएड अभ्यासक्रम विद्यापीठात लवकरच सुरु करण्यासंदर्भात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकचे कुलगुरू डॉ. के. वायुनंदन यांनी राज्य पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आश्वासित केले.
कुलगुरूं सोबत विद्यापीठात झालेल्या बैठकीत बोलताना कुलगुरू म्हणाले, नोकरी, कामधंदा करताना शैक्षणिक अर्हता वाढविता यावी या उद्देशाने विद्यापीठाने अनेक कोर्स चालू केले. एमपीएड संदर्भात लवकरच विद्यापीठाचे तज्ञ, शारीरिक शिक्षक संघटना यांचे कोअर कमिटीसोबत बैठक करून या बाबत आराखडा तयार करून गरज लक्षात घेता अभ्यासक्रमाबाबत पुढील मार्गक्रमण केले जाईल.
यासाठी विद्यापीठाकडून सर्व सहकार्य करण्यात येईल व सुट्टीतील एमपीएड कोर्स लवकरच चालू करण्यात येईल असे कुलगुरू यांनी राज्य पदाधिकाऱ्यांना आश्वासित केले.
राज्यातील उपलब्ध पदे व स्थिती, बीपीएड कॉलेज, अभ्यासक्रम या बाबत संजय पाटील यांनी, एमपीएड रेग्युलर कोर्स, अभ्यासक्रम, कालावधी, विषय रचनाबाबत अमोल जोशी यांनी, तर बहिःस्थ एमपीएड कोर्सची आवश्यकता, प्रात्यक्षिक परीक्षा, अभ्यासकेंद्राबाबत राज्य अध्यक्ष राजेंद्र कोतकर, दिनेश अहिरे यांनी सविस्तर माहिती बैठकीत दिली. या वेळी क्रीडा भारतीचे विभागीय अध्यक्ष संजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष राजेंद्र कोतकर, ड्रॉपरोबॉलचे राज्य सचिव दिनेश अहिरे, सुनिल गागरे, हिरामण शिदे, शंकर आहेर, युवा शारीरिक शिक्षक संघटनेचे अमोल जोशी, स्वप्नील करपे, सतीश कांबळे ,संतोष लहाने, प्रणव अहिरे, चिन्मय देशपांडे, अक्षय गामने यांच्यासह राज्यभरातील विविध जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

फोटो-

प्रतिक्रिया व्यक्त करा