आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला आहे. श्री बाघम्बरी मठाच्या गादीवरून नरेंद्र गिरी यांचा शिष्य आनंद गिरी यांच्यासोबत वाद सुरू होता. अन्य संत महंतांकडून हा विवाद सोडवण्याचा प्रयत्न सुरू असतानाच प्रयागराज इथं नरेंद्र गिरी यांचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे.
श्री बाघम्बरी मठात महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह गळफास लावलेल्या स्थितीत आढळला, ज्या घरात गिरी यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत होता, त्या घराचे सर्व दरवाजे बंद होते.
महंत नरेंद्र गिरी यांच्या निधनावर, शिष्य आनंद गिरी यांनी गुरुजींची हत्या झाली असून या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे असं म्हटलं आहे.
आनंद गिरी म्हणाले की, काही लोक आमच्यात आणि गुरुजींमध्ये दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. गुरुजींशी माझं जेव्हा बोलणं झालं तेव्हा ते पूर्णपणे तंदरुस्त होते, आणि त्यांनी कोरोनावरही मात केली होती.
याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. घटनास्थळी स्थानिक पोलीस अधिकारी उपस्थित असून मोठ्या प्रमाणात सुरक्षा दलं तैनात करण्यात आली आहेत. यूपी पोलिसांसह फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी पोहोचली असून पुरावे गोळा केले जात आहेत. दुसरीकडे, सपा नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी महंत नरेंद्र गिरी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.
*गुरु-शिष्यामध्ये सुरु होता वाद?*
नरेंद्र गिरी यांचे त्यांचे शिष्य आनंद गिरी यांच्याशी वाद सुरु होते. आनंद गिरी यांच्यावर मठ आणि मंदिराच्या निधीचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी कारवाईही करण्यात आली होती. आखाडा, मठ आणि मंदिरातून हद्दपार झाल्यानंतर आनंद गिरी आपले गुरु महंत नरेंद्र गिरी यांच्या विरोधात सातत्याने निवेदने देत होते.
यानंतर आखाडा परिषदेने या मुद्द्यावर एक बैठक बोलावली होती. संत आणि संतांची सर्वात मोठी संस्था असलेल्या अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांनीही गुरु पौर्णिमेच्या दिवशी आनंद गिरीला क्षमा केल्यानंतर मंदिरात प्रवेश करण्याची परवानगी दिली होती.