राष्ट्रवादी नेते तथा सृष्टी परिवर्तन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रत्नकांत कदम यांची नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंकडे मागणी
सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हापरिषद, ग्रामपंचायत अंतर्गत अनेक पर्यटन स्थळे येत असून समुद्र ठिकाणी असलेल्या पर्यटन स्थळांवर असलेले सागरी जीवरक्षक स्वतःचा जीव धोक्यात घालून पर्यटकांचा जीव वाचवत असतात. परंतु या जीव रक्षकांना तात्पुरत्या स्वरूपात राबविण्यात येत आहे. मात्र अपघातावेळी त्यांच्या जीवितास हानी झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना याची झळ सोसावी लागेल. त्यामुळे या जीव रक्षकांच्या वेतनात वाढ करून त्यांचा विमा उतरविण्यात यावा आणि जीवितहानी झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीची तरतूद करण्यात यावी. तसेच पर्यटन स्थळावर काम करण्यासाठी त्यांना योग्य ते साहित्य पुरविण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी नेते तथा सृष्टी परिवर्तन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रत्नकांत कदम यांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
पर्यटन स्थळांवर असणारे जीवरक्षक प्रसंगी आपला जीव धोक्यात घालून पर्यटकांचे प्राण वाचवत असतात. परंतु या जीव रक्षकांना ६०००/- रुपये मानधनावर राबविण्यात येत आहे. या जीव रक्षकांचा वेतनात वाढ करून ते १८,०००/- ते २०,०००/- पर्यंत करण्यात यावे. तसेच या कामगारांचा विमा उतरविण्यात यावा आणि त्यांच्या जीवास धोका निर्माण झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदतीची तरतूद करण्यात यावी. पर्यटकांना वाचवितेवेळी जीवरक्षक आणि पर्यटक हे दोन्ही सुखरूप राहण्याच्या दृष्टीने पर्यटन स्थळावर शासनाने ठरविल्याप्रमाणे बोट, जॅकेट, रिंग व इतर साहित्य त्वरित पुरविण्यात यावे आणि सागरी जीव रक्षकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी रत्नकांत कदम यांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.