*उसळी*
ती जात्याच खूप हुशार होती. अगदी मनस्विनी, स्वाभिमानी, जिद्दी, करारी. किती गोष्टींची आवड होती तिला. करेल ती गोष्ट अगदी आखीव रेखीव. एकदम ‘ परफेक्ट ‘. कुणाला वावगं बोलणार नाही. पण कुणाचं वावगं खपवून पण घेणार नाही. त्यामुळे बरेच जण तिला गर्विष्ठ, अतिशहाणी ठरवून दूरच रहात.
लग्न ठरल्यावर मात्र वडीलधाऱ्यांनी बजावले, ” इथे माहेरी ठीक होतं. आता नवीन घर, नवी माणसे. तेव्हा सर्वांशी जुळवून घे. उगाच वाद घालत बसू नकोस. ” तशी ती संयमी होती. त्यामुळे थोडी शांतच राही. काही वेळा तिने स्वतःच्या मनाने काही गोष्टी केल्याही. पण वाद झाला. मग उगाच कटकटी नकोत म्हणत ती दबूनच राहू लागली. मग हळूहळू मनाला तशी सवयच होत गेली.
पुलाखालून बरंच पाणी वाहीलं. घरातल्या जबाबदार्याही थोड्या कमी झाल्या. आता ती बेचैन राहू लागली. एखादी दबावाखाली असणारी स्प्रिंग दाब थोडासा कमी होताच जशी उसळी मारून वर येते आणि सर्व उलटेपालटे करते तसंच तिचं झालं. एवढे दिवस दबून राहिलेलं मन बंड करून उठलं. तिने बराच विचार केला. आता स्वतःला जरा वेळ द्यायचा. जे स्वतःला आवडेल तेच आता करायचं. तिने आपले नवे रुटीन आखले. आवडीच्या गोष्टींना प्राधान्य दिले.
यावरून घरात कुरबुरी पण झाल्या. पण ती मात्र शांत आणि ठाम राहिली. प्रत्येक गोष्टीतलं तिचं कसब, जिद्द, कष्ट बघून बाकीचे पण प्रभावित होऊ लागले. इतके दिवस बारीक-सारीक गोष्टी वरून तिला बोलणारे आता जरा जपूनच राहू लागले. आता इतर कुणी नाही तर फक्त ती बोलत होती. तेही आपल्या कृतीतून. तिच्या आयुष्यात समाधानाचे, आनंदाचे सूर उमटत होते.
ज्योत्स्ना तानवडे.पुणे