दोन वर्षात ठेकेदारांची ११३ कोटींची बिले थकली…
मालवण
जिल्ह्यातील दोन्ही विभागातील सार्वजनिक बांधकाम विभागासह, अन्य बांधकाम विभागाच्या वतीने केलेल्या विकास कामांपैकी सुमारे ११३ कोटी रुपयांचे ठेकेदारांचे बिल गेली दोन वर्षे रखडले आहे. अशा परिस्थितीत आमदार वैभव नाईक जनतेला नव्या विकास कामांबाबत खोटी आश्वासने देत सुटले आहेत. त्यांनी प्रथम रखडलेली ठेकेदारांची बिले देण्यासाठी निधी आणावा आणि नंतरच नवीन आश्वासने द्यावीत. अदृश्य विकासाचे खेळ त्यांनी थांबवावेत अशी टीका मनसेचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
मालवण येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री, माजी मनविसे जिल्हाअध्यक्ष अमित इब्रामपूरकर, विल्सन गिरकर, मनविसे तालुकाध्यक्ष विनायक गावडे, निखिल गावडे, प्रणव उपरकर आदी उपस्थित होते. श्री. उपरकर म्हणाले, जिल्ह्यात अनेक ठिकाणी परप्रांतीय कामगार, मजूरांचा सहभाग आहे. या सर्व परप्रांतीय कामगार, मजूरांची नोंद पोलिसांनी ठेवणे आवश्यक आहे. राज्यात, जिल्ह्यात जे मोठ मोठे गुन्हे घडत आहेत. या गुन्ह्यांमध्ये परप्रांतीयांचा मोठा सहभाग असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे वाळू उपसा, हॉटेल तसेच अन्य ठिकाणी असणार्या परप्रांतीय कामगारांची नोंद पोलिस प्रशासनाने संबंधित ठेकेदार व मालकांमार्फत करावी. ज्या परप्रांतीयांची नोंद असणार नाही. त्यांच्यावर कारवाई करावी यासाठी लवकरच जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर २२ सप्टेंबरला जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यामध्ये परप्रांतीयांच्या नोंदीबाबत मनसेच्यावतीने निवेदन दिले जाणार आहे. अशी माहितीही श्री. उपरकर यांनी यावेळी दिली.