दिनांक 15/9/ 2021 स्व. सुदन तुझा प्रथम स्मृतिदिन
भोगले यांच्या हॉटेल हनुमान मध्ये गेल्यावर एकही दिवस असा जात नाही की तुझी आठवण होत नाही. सर्वांना साहेब म्हणून तुझी हाक मारण्याची पद्धत अजूनही कानात घर करून राहिली आहे.
तू सरपंच, सभापती, उपाध्यक्ष व प्रभारी जि.प. अध्यक्ष ही सर्व पदे उपभोगली. पण मैत्रीत अहंपणा केव्हाच जाणवला नाही. पांडव ग्रुपचे आम्ही सर्व मित्र तुला भेटावयास एकदा जि. प. सिंधुदुर्ग मध्ये आले असताना चिठ्ठी दिली की, बांदिवडेकर साहेब आम्ही फोंड्यातून भेटावयास आलो आहोत. फोंडा म्हटल्यावर तुझी मिटींग चालू असतानाही तु शिपायाकरवी आम्हाला चहा पाणी देण्यास सांगितले. मिटींगही लवकर आटोपून आत मधे बोलावले आणि म्हणालास अजित या चिठ्ठीवर तुम्ही साहेब का लिहिलं मी तुमचा सर्वांचा सुदनच आहे. आपला पांडव ग्रुप आहे. मला साहेब म्हणू नका. पण त्या ठिकाणी आमचा मित्र यापेक्षा जिल्ह्याचा एक पदाधिकारी आहेस हे कसे विसरून चालेल.
आज तू गेल्याला एक वर्ष झाले. परंतु फोंडा व्यापारी अध्यक्ष पद आजही रिक्त आहे. सर्वजण प्रभारी म्हणूनच पद स्वीकारतात. परंतु प्रशासनावर तू व्यापारी अध्यक्ष असताना ठेवलेला वचक विसरून चालणार नाही. एकदा जि.प. अध्यक्ष असतेवेळी एस.टी. चालकाकडून तुझ्या सरकारी गाडीला एस.टी. लागली. चालक वयोवृद्ध असल्यामुळे आणि सेवानिवृत्तीला दोन महिने असल्याने तू सर्व सहन करून ते काम स्वखर्चाने करुन घेतलेस. श्री राधा कृष्णा चा भक्त असलेने सकाळी दर्शन घेतल्याशिवाय कामावर जात नव्हतास किंवा वेळ असेल त्यावेळी बाळा भोगले यांच्या हॉटेलात आलास की मला, बबन पवार ला बोलावून मगच चहा घ्यायचा, हरिनाम सप्ताहमधील तुझी लगबग कायमच लक्षात राहील.
2020 ला मी म्हटलं सर्व बॅचचे बॅच गेट-टुगेदर करूया, त्यावेळी त्वरित नियोजन करून 15 शिक्षक आणि 45 विद्यार्थी यांचे उत्साहाने गेट-टुगेदर संपन्न केले आज त्याची त्या प्रसंगाची आठवण होऊन मन भरून येते. खासदार केंद्रीय मंत्री दादा आणि आमदार मा. नितेशजी राणे यांचा तुझ्यावरचा विश्वास अपार होता. खरच हे लिहिताना तुझ्या अनंत गोष्टी आठवतात. अनंतात तुला चिरशांती मिळेलच!
तुझा मित्र
अजित नाडकर्णी
पांडव ग्रुप फोंडाघाट