केंद्रीय मंत्री नारायण राणे हेच माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना पक्ष,पद, आणि प्रतिष्ठा वाटते. त्यामुळे पक्ष बदलण्याचा प्रश्न येतंच नाही.जिथं असू तिथं प्रामाणिक काम करतो. जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीत सत्ता मिळविण्यासाठी तुम्ही पन्नास लाखाच्या वड्याचे प्रदर्शन मांडले होते त्याला आम्ही भुललो नाही उलट छत्रपती शिवाजी महाराज यांचा गनिमी कावा नितीचा वापर करत तुमचे सत्तांतराचे मानसुबे आम्ही धुळीस मिळविले. तेव्हा जिथं वडा तिथं खडा होणाऱ्यापैकी आमची अवलाद नाही. हे जी. प. सदस्य प्रदीप नारकर यांनी अभ्यासावे.लालची असतो तर तुमच्या पन्नास लाखाच्या वडा प्रदर्शनात खडा झालो असतो एवढे अज्ञानी नारकर कसे काय? असा टोला समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांनी नारकर यांना लगावला.
गेल्या चार वर्षात नारकर जी. प. च्या कारभारबाबत बोलत नव्हते पण आता त्यांना अचानक कंठ फुटला म्हणजे’ हत्ती घोडे वाहून गेलेत गाढव विचारी पाणी किती खोल ‘अशीच तऱ्हा झाली कि काय?
शिवसेनेचे जी. प. सदस्य प्रदीप नारकर यांनी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांच्यावर टीका केली होती. त्याला जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकातून उत्तर दिले.
शिवसेना किंवा जी. प. सदस्य नारकर यांचा त्रागा आणि माझ्यावरचा राग मी समजू शकतो. कारण जी. प. मधील सत्तांतराचा हातातोंडांशी आलेला घास आम्ही राणे साहेबांच्या शिलेदारांनी आणि भाजपने त्यांना घेऊ दिला नाही.त्यामुळे सेनेचे जी. प. सदस्य हतबल झाले आहेत. त्यांना फक्त नसलेला भ्रष्टाचार दिसतो. शिक्षक पुरस्कार वितरणात चुका दिसतात. उलट राज्य सरकारने दोन वर्षे पुरस्कार दिले नाहीत त्यावर आवाज उठवीला पाहिजे. राज्य सरकारने मोबाईल खरेदीत केलेला घोळ यावर बोलले पाहिजे. पण नारकर यावर मूग गिळून गप्प आहेत. कारण त्यांना फक्त पुढे होऊ घातलेल्या जी. प. निवडणूका नजरेसमोर दिसत आहेत त्यामुळेच ते सतत जी. प. ची बदनामी करू पाहत आहेत.
प्रश्न आला माझ्या पक्षांतराचा तर नारकर यांना अवगत करून देतो. राजकारणात पक्ष आणि व्यक्तीनिष्ठ असे प्रवाह असतात. माझे राजकारण हे कोकणचा ज्यांनी विकास करून कोकणी माणसाला ताठ मानेन जगायला शिकवील ते माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्यावरील निष्ठेचे आहे. त्यामुळे माझ्यासाठी पक्ष, पद आणि प्रतिष्ठा राणे हेच आहेत. आणि राणे ज्या पक्षात असतील तिथे प्रामाणिक राहायचं. त्यामुळे जी. प. अध्यक्ष निवडणूकित राणे यांच्यावरील निष्ठा आणि पक्षाशी प्रामाणिक राहिलो. तुमच्या कूजक्या वड्याला भुललो नाही. त्यामुळे नारकर यांनी अभ्यास न करता उगाचच शब्दांचा खेळ करून अज्ञान प्रकट करून हसे करून घेऊ नये.टीका जरूर करा तो तुमचा अधिकार आहे
राहिला प्रश्न तुमच्या आयुक्त किंवा राज्य सरकारच्या यंत्रणा वापरून जी. प. ला जेरीस आणायचे किंवा धमकावत असाल तर त्याला आम्ही भीक घालत नाही. तुम्हांला जे करायचे ते करा भाजप आणि राणे यांचे शिलेदार समर्थ आणि सक्षम आहेत.तुम्ही कितीही प्रयत्न करा किंवा बदनामी करा जनता सुज्ञ आहे. जी. प. ची सत्ता भाजप आणि राणे यांच्याच हाती परत देणार आहे. तेव्हा नारकर आणि कंपनीने उगाच सत्तेची दिवास्वप्न रंगवू नयेत. असा सल्लाही जाधव यांनी दिला.