‘माझी शेती माझा सात बारा, मीच नोंदवणार माझा पीक पेरा’ या महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या अंतर्गत ई-पीक पाहणी मोबाईल ऍप डाउनलोड करून स्वताच्या जमिनीतील पिकाची नोंद यावर करावी, असे आवाहन कणकवलीचे तहसीलदार आर. जे. पवार यांनी केले आहे. १३ ऑगस्टपासून ही योजना शासना मार्फत सुरू करण्यात आली आहे. प्ले स्टोअरवरून हा ऍप डाउनलोड करून घेत त्यात खातेदाराच्या आपली माहिती द्यायची आहे. त्यानंतर नोंदणीकृत मोबाईलवर ओटीपी देण्यात येणार आहे. या ओटीपीचा समावेश केल्यानंतर शेतकऱ्याने आपल्या शेताच्या पीकपेऱ्याची माहिती नोंद केल्यानंतर फोटोसह माहिती या ऍपवर डाउनलोड करायची आहे.
जेवढी पिके असतील तेवढी माहिती या ऍपवर भरता येणार आहे. आपल्या तालुक्यात पिकाचा प्रकार निवडताना आता निर्भेळ पीक निवडायचे आहे. त्यानंतर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर माहिती अपलोड करायची आहे. त्यानंतर तलाठी याला मंजुरी देणार आहेत. गणेशोत्सवासाठी गावी आलेल्या चाकरमान्यासह तालुक्यातील सर्वच खातेदारांनी या ऍपद्वारे नोंदणी करावी असे आवाहन तहसीलदार आर. जे. पवार यांनी केले आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी ०२०२५७१२७१२ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.