बांदा
इन्सुलीतील आरटीओ तपासणी नाक्यावर कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचा-यांकडून “एन्ट्री-फी च्या नावाखाली वाहनचालकांची लूट होत आहे. या ठिकाणी कार्यरत असलेले कर्मचारी लाखो रुपयांची वर कमाई करत आहेत, असा आरोप राष्ट्रवादीचे युवक विधानसभा अध्यक्ष शैलेश लाड यांनी केला आहे. दरम्यान संबंधित अधिकारी व कर्मचारी पैसे घेतानाचे व्हिडिओ देखील आहेत. त्यामुळे लवकरच पुरावे उघड करून संबंधितावर कारवाई करण्यासाठी वरिष्ठांचे लक्ष वेधणार, असा इशारा त्यांनी दिला आहे. याबाबत श्री.लाड यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे.
त्यात असे नमूद करण्यात आले आहे की, आरटीओ कार्यालय हे भ्रष्ट्राचाराचे कुरण बनले आहे. ओरोस येथील जिल्हा कार्यालय हे सर्वसामान्यांसाठी नसून याठिकाणी पैसे लाटण्यासाठी एजंटगिरी निर्माण करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसात आरटीओ कार्यालयाविरोधात अनेक तक्रारी आपल्याकडे आल्या होत्या. त्याची आपण योग्य शहानिशा केली. त्यावेळी धक्कादायक माहिती समोर आली. दिवसाला तब्बल एक लाख रुपयांची कमाई या नाक्यावर करण्यात येते. कोरोना महामारीच्या काळात जनता आर्थिक मेटाकुटीला असताना आरटीओ कार्यालय मात्र कारवाईचा बडगा दाखवत वारेमाप कमाई करत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोव्यात होणारी बेकायदा गौण खनिज वाहतूक ही या कार्यालयाच्या आशीर्वादानेच होत असल्याचा आरोप लाड यांनी केला आहे. एका रात्रीत तब्बल ५०० हुन अधिक डंपर येथून एन्ट्री फी देऊन मार्गस्थ होतात. त्यामुळे दिवसाकाठी लाखोंचा मलिदा हे कार्यालय लुटत आहे. लवकरच याचा पर्दाफाश करण्यात येणार आहे. यासाठी आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लक्ष वेधणार असल्याचे लाड यांनी सांगितले.