मालवण
सिंधुदुर्ग जिल्हा महिला मत्स्य व्यावसायिक सहकारी संस्था मालवणच्यावतीने यावर्षी ही सुमारे तीन हजार महिला मत्स्य व्यावसायिक सभासदांना गणेश चतुर्थी पूर्वी माफक दरात जीवनावश्यक धान्याचे वाटप करण्यात आल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा व मच्छिमार नेत्या सौ. स्नेहा जितेंद्र केरकर यांनी दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टीच्या अनेक गावातील महिला आपल्या दैनंदिन चरितार्थासाठी मच्छि विक्री बरोबर मत्स्य व्यवसायाशी निगडित व्यवसाय करतात अशा महिलांना महिला मच्छिमार नेत्या सौ. स्नेहा केरकर आणि सहकाऱ्यांनी सुमारे दहा वर्षापूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा महिला मत्स्य व्यावसायिक सहकारी संस्थेची स्थापना केली. २०१३ साल पासून या संस्थेच्या महिला सभासदांना गणेश चतुर्थीचे औचित्य साधून बाजार भावापेक्षा माफक दरात कडधान्य व तेलाचे वाटप करण्याचा उपक्रम राबविला जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील गावांमधील महिला सभासदांना हे वाटप करण्यात येते. या उपक्रमाचे यावर्षी नववे वर्ष असून आठ दिवसापूर्वी या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. हे धान्याचे किट विविध गावातील प्रमुख प्रतिनिधीं मार्फत घरपोच केले जात आहेत.
आतापर्यंत आचरा, तळाशील, तोंडवळी, सर्जेकोट, कोळंब, वायरी भूतनाथ, वायरी टिकम शाळा, गवंडी वाडा, केळुस, कर्ली, तारकर्ली, देवबाग याठिकाणी हे धान्याचे वाटप करण्यात आल्याची माहिती सौ. स्नेहा केरकर यांनी दिली. या कामी सौ. स्नेहा केरकर यांना संस्थापक चंद्रशेखर उपरकर,डॉ जितेंद्र केरकर, डॉ राऊळ, कायलट तांडेल,राजलक्ष्मी शिरोडकर, हिरांगणी केळुसकर, सौ. खोबरेकर, रेश्मा मांजरेकर, विशाखा तरवडकर, गौरी सारंग, अनिता कोचरेकर, पिंकी पेडणेकर, आशा लॉरेन्स आदी व इतर सहकार्य करीत आहेत.