सध्या करोनाच्या काळात राज्य परिवहन मंडळ हलाखीच्या परिस्थितीत सुरू असून त्यात कर्मचाऱ्यांना जवळपास दोन महिने पगार द्यायला प्रशासनाला पैसे नसताना देखील रिटायर झालेल्या विभाग नियंत्रकाला पुन्हा कामावर रुजू करून घेण्याच्या हालचाली जोरात सुरू असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेला मिळालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना असे झाल्यास विभाग नियंत्रक कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडणार. कारण या आधी सुद्धा एका विभाग नियंत्रकाला दोन वर्ष वाढीव मुदत दिली गेली होती, ती कशाला व का याचा शोध लावणे गरजेचा आहे.
सक्षम अधिकारी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उपलब्ध नाही आहे का? की जे उपलब्ध आहेत त्यांची त्या पदावर काम करायची लायकी नाही हे कळणे गरजेचे आहे. फक्त दीड ते दोन हजार रुपये वाढीव पगार देऊन खालच्या पदाच्या अधिकाऱ्याला ती जागा प्रशासन सहज देऊ शकते, असे असताना निवृत्त झालेला विभाग नियंत्रकाला का परत बोलवले जात आहे व त्याच्या मागे कोणाचा हात आहे हे समजणे गरजेचे आहे. असे काय आहे व त्या निवृत्त झालेल्या विभाग नियंत्रकांनी आतापर्यंत प्रशासनाचे असा काय फायदा केला ज्यामुळे प्रशासन त्याच्यावर एवढी मेहरबानी दाखवत आहे.
एका बाजूने आहे त्या कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी पैसे नाहीत व असल्या निवृत्त झालेल्या लोकांना देण्यासाठी प्रशासन एवढी तडजोड का करत आहे. अनेक असे महाराष्ट्रामध्ये निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत रुजू करून त्यांच्यावर मेहरबानी प्रशासन का करत आहे, की परिवहन मंत्री यांच्या आदेशाने हे कृत्य सुरू आहे? याचा लवकरच महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना उलगडा करणार आणि ज्या ज्या ठिकाणी असे निवृत्त झालेले कर्मचारी प्रशासनाने या कठीण काळात नेमणूक केल्यास त्या त्या ठिकाणी जाऊन महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना आंदोलन करणार असल्याचा इशारा नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष बनी नाडकर्णी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.