You are currently viewing महावितरणचे “बेबंद तोडकाम” थांबवण्यासाठी भाजपाची रस्त्यावर उतरायची तयारी ! पालकमंत्र्यांचे आदेश फेल!!

महावितरणचे “बेबंद तोडकाम” थांबवण्यासाठी भाजपाची रस्त्यावर उतरायची तयारी ! पालकमंत्र्यांचे आदेश फेल!!

पालकमंत्री उदय सामंतांचा “गणेश चतुर्थी कालावधी” यावर्षीचाच ना?

भाजपा सोशल मीडियाचे अविनाश पराडकर यांचा सवाल

लॉकडाऊननंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामान्य जनतेचे काय हाल आहेत हे पालकमंत्री उदय सामंत यांनी समजून घ्यावेत. तुमच्या रिंगणातील ठेकेदारांची बिले निघाली म्हणजे जिल्ह्यातले उद्योग सुरू झालेत असे नव्हे. गणेश चतुर्थी कालावधीत लोकांची वीज बिले भरली नाहीत म्हणून तोडायला देणार नाही असे पालकमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले आहे. कोकणातला गणेश चतुर्थी कालावधी नेमका कधी सुरू होतो याची पालकमंत्र्यांना कल्पना नसावी असे दिसते. गणेश चतुर्थी तोंडावर आली आहे आणि आर्थिक दृष्ट्या खचलेली जनता त्यासाठी काहीना काही तजवीज करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र याच कालावधीत महावितरणने जोरदार वसुली मोहीम चालवली असून लोकांची वीज तोडून त्यांच्याकडून धाकदपटशाहीने वसुली चालवली जात आहे. अनेक ठिकाणी त्यासाठी दादागिरी करताना घरातील महिलांना त्रास देण्याचा घृणास्पद प्रकारही समोर आला आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी हे महावितरणचे “बेबंद तोडकाम” आजच थांबवण्याचे आदेश देऊन कोकणच्या जनतेशी काडीमात्र जरी सोयरसुतक असेल तर ते आजच दाखवून द्यावे. चतुर्थी आधीच जर जनतेला रस्त्यावर आणत ही वसुली चालवली जाणार असेल, तर चतुर्थीच्या कालावधीत कोणाचीही वीज कापू दिली जाणार नाही या म्हणण्याला काय अर्थ उरतो? कोकणी पालकमंत्र्यांच्या आदेशाला उपरे अधिकारी फाट्यावर मारणार असतील, तर तसेही सांगावे, कोकणी पालकमंत्र्यांच्या आदेशाची लाज राखण्यासाठी भाजपा नक्कीच रस्त्यावर उतरुन सहकार्य करेल. पण कोकणी जनतेची चतुर्थीच्या तोंडावर चाललेली लुटमार आजच थांबवावी, असे अविनाश पराडकर यांनी म्हंटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा