श्रावण महिना म्हणजे सणांचा महिना. कोकण हा समुद्र किनारपट्टीचा प्रदेश, त्यामुळे मांसाहार हा सर्रास कोकणी माणसांचा आवडता. परंतु कोकणात वर्षभर मांसाहार करणारे कित्येकजण श्रावणात संपूर्ण महिना अगदी अनंतचतुर्दशी पर्यंत शाकाहार करून श्रावणातील सर्व सण भक्तिभावाने आणि उत्साहात साजरे करतात. श्रावणात अष्टमीला येणारा महत्वाचा सण म्हणजे गोकूळअष्टमी. कोकणात गणेशाची पूजा घरोघरी करतात, परंतु कोकणातील काही घरांमध्ये गोकूळाष्टमी देखील भक्तिभावाने साजरी केली जाते.
गोकूळाष्टमी दिवशी कोकणातील ठराविक घरांमध्ये श्रीकृष्णाची एक ते दीड फूट उंचीची वेगवेगळ्या रूपातील मूर्ती आणून त्याची पुरोहितांकडून विधिवत पूजा-आर्चा केली जाते. रात्री उशिरा नैवेद्य दाखवून उपवास सोडला जातो. आंबोली, वाटण्याची उसळ आणि मुख्य म्हणजे शेवग्याच्या पानांची भाजी हा उपहार गोकुळाष्टमीला असतो. रात्री उशिरा गावातील भजन मंडळांकडून श्रीकृष्णाच्या पूजेनिमित्त भजन केले जाते. दहीहंडीच्या दिवशी सगे शेजारी सर्वांना महाप्रसाद दिला जातो.
संध्याकाळी घरी आरती केल्या जातात व दहिकाल्याच्या दिवशीच संध्याकाळी देवासमोर कुटुंबाच्या कल्याणासाठी गाऱ्हाणे करून श्रीकृष्णाला उत्साहात, आनंदात, फटाक्यांच्या आतशबाजीत नदीवर, समुद्रावर आरती करून विसर्जन केले जाते. श्रीकृष्णाचा नैवेद्य म्हणून सर्वांना पंचखाद्य वाटले जाते, आणि त्यानंतर प्रतीक्षा उरते ती गणरायाच्या आगमनाची.