फोंडाघाट
गेले आठ दिवस फोंडाघाट बाजार पेठेतील श्री देव राधाकृष्ण मंदिरात श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा पारंपारिक पद्धतीने, शासनाचे सर्व नियमांची अंमलबजावणी करीत उत्साहाने साजरा करण्यात आला. मंदिराला रोषणाई करण्यात आली होती. बालगोपाळांचा आधारस्तंभ स्व.आण्णा कोरगावकर यांची उणीव पदोपदी मंदिरात जाणवत होती. तरीही त्यांनी घालून दिलेल्या मार्गावर नटखट कन्हैयाचा सोहळा शांततेत आणि शिस्तीने पार पडला.
गेले पाच दिवस श्रीकृष्णाच्या लीलांवर आधारित विवेक गोखले यांचे प्रवचनादी किर्तनाचा आस्वाद रसिक-भाविकांनी घेतला. आणि अष्टमिच्या रात्री “राधाsकृष्ण,गोपाळss कृष्ण” च्या गजरात, किर्तनाच्या संगतीने कृष्ण-जन्म झाला.फटाक्यांची आतषबाजी झाली. यावेळी त्याचे औक्षण करून पाळण्यात निजवतांना पेठेतील सुवासिनींनी पाळणा म्हटला. पालखी प्रदक्षिणा उत्साहात पार पडली. पंचखाद्याचा नैवेद्य आणि दह्या-दुधाच्या प्रसादाचा आस्वाद उपस्थितांनी घेतला.
यावेळी हेरंब योगेश पारकर या पाच वर्षाच्या मुलाची, बाळकृष्णाची वेशभूषा सर्वांना लक्षवेधी ठरली. दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच बाळ गोपाळांच्या रंगारंग पिचकाऱ्यांनी पेठेतील माहोल रंगीबेरंगी झाला. मंदिरा पुढील दहीहंडी थर लावून फोडल्यानंतर बालगोपाळांनी गावातील विविध ठिकाणच्या दहीहंड्या फोडताना पारंपारिक हरवत चाललेल्या खेळांचे दर्शन घडविले. शेवटी उगवाई नदीवर आरती होऊन, प्रार्थना होऊन घरोघरीच्या श्री-मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.