सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुख्याधिकाऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
ओरोस
ठाणे महानगरपालिकेच्या उपआयुक्त श्रीमती कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ला प्रकरणाचे पडसाद सिंधुदुर्ग जिल्ह्यातही उमटले आहे. जिल्ह्यातील सर्व नगरपंचायतीचे मुख्याधिकारी व नगरपालिकांचे कर्मचारी एकवटले आहेत. जिल्ह्यातील सर्व नगरपालिका नगरपंचायतींच्या मुख्याधिकाऱ्यानी एकत्र येत मंगळवारी जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांची भेट घेतली या प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी म्हणून निवेदन सादर केले.
अनधिकृत हातगाड्यांवर कारवाई करताना ठाणे महानगरपालिकेच्या उप आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर एका परप्रांतीय व्यवसायिकाने धारदार शस्त्राने हल्ला करत गंभीर जखमी केल्याच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. “अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध असो… कर्मचारी एकजुटीचा विजय असो” अशा घोषणा देत यावेळी कर्मचाऱ्यांनी या प्रकरणातील अटक असलेल्या गुन्हेगारावर शीघ्र गतीने खटला चालवून कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी शासनाने विशेष प्रयत्न करावेत अशी मागणी करण्यात आली आहे याबाबतचे निवेदन नगरपालिका कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी जिल्हा प्रशासन अधिकारी वैभव साबळे, मालवण मुख्याधिकारी संतोष जिरगे, वेंगुर्ला मुख्याधिकारी अमितकुमार सोंडगे, कणकवली मुख्याधिकारी अवधुत तावडे, कुडाळ मुख्याधिकारी नितीन गाढवे, कसई दोडामार्ग मुख्याधिकारी शिवराज गायकवाड, वाभवे-वैभववाडी मुख्याधिकारी सुरज कांबळे, देवगड-जामसंडे मुख्याधिकारी कौस्तुभ गव्हाणे आदी उपस्थित होते.