बांदा शहरातील राष्ट्रीयीकृत बँकांच्या व्यवस्थापकांना निवेदन…
बांदा
गणेश चतुर्थी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांची गैरसोय होऊ नये यासाठी बांदा शहरातील सर्व बँकांच्या एटीएममध्ये या कालावधीत पर्याप्त रक्कम उपलब्ध करावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. आज शहरातील सर्व राष्ट्रीयीकृत बँकांच्या व्यवस्थापकांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे.
बांदा बाजारपेठ ही आजूबाजूच्या ३० ते ४० गावांची मुख्य बाजारपेठ आहे. लगतच्या गोवा राज्यातील पेडणे तालुक्यातील लोकही मोठ्या संख्येने बांद्यात खरेदीसाठी येतात. बांदा शहरात राष्ट्रीयीकृत बँकांची ३ एटीएम व सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे १ एटीएम सेंटर आहे. ग्राहक संख्येच्या तुलनेत एटीएम सेंटर कमी असल्याने गणेश चतुर्थी कालावधीत एटीएम सेंटरमध्ये पैसे असतील याची वेळोवेळी खातरजमा व्यवस्थापकांनी करावी. तसेच बाजार कालावधीत पैसे संपल्यास तात्काळ रोकडची उपलब्धता करावी अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र व सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या एटीएमची मर्यादा ही प्रति व्यवहार केवळ दोन हजार रुपये असल्याने सणाच्या कालावधीत ही मर्यादा १० हजार रुपये प्रति व्यवहार करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी सर्व बँक व्यवस्थापकांनी एटीएम मध्ये पुरेशी रक्कम ठेवण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले.
यावेळी युवक विधानसभा अध्यक्ष शैलेश लाड, युवक तालुकाध्यक्ष राजू धारपवार, विद्यार्थी सेलचे कौस्तुभ नाईक, असलम खतीब, अझर खतीब आदी उपस्थित होते.