एबी डिव्हिलियर्स याचा विक्रम मागे टाकण्याची संधी धोनीला
नवी दिल्ली :
फक्त काही तास आयपीएलच्या १३व्या हंगामाला शिल्लक आहेत. स्पर्धेतील पहिली लढत ४ वेळा विजेते मुंबई इंडियन्स विरुद्ध ३ वेळा विजेते ठरलेले चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. गेल्या वर्षी फायनल सामन्यात मुंबईने चेन्नईचा एक धावाने पराभव केला होता. या सामन्यात सर्वांची नजर असेल ती भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याच्या कामगिरीवर. तब्बल १४ महिन्यांनी धोनी क्रिकेट खेळणार आहे. त्याने अखेरचा सामना हा २०१९च्या वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. त्यानंतर गेल्याच महिन्यात त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आहे. धोनीने १७४ सामन्यापैकी १०४ मध्ये विजय मिळवला आहे. त्याची विजयाची टक्केवारी ५९.८ टक्के इतकी आहे. आता १४ महिन्यांनी क्रिकेट खेळणाऱ्या धोनीला पहिल्याच सामन्यात एक विक्रम करण्याची संधी आहे. धोनीला रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरू संघाचा धडाकेबाज फलंदाज एबी डिव्हिलियर्स याचा विक्रम मागे टाकण्याची संधी आहे.
‘महेंद्रसिंह धोनी’ हा महेंद्रसिंग आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. धोनीने २०९ षटकार मारले आहेत. तर एबीच्या नावावर २१२ षटकार आहेत. जर मुंबई विरुद्धच्या सामन्यात धोनीने ४ षटकार मारले तर तो एबीला मागे टाकू शकेल.
‘किंग्ज इलेव्हन पंजाबचा ख्रिस गेल’ याच्या नावावर आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आहे. गेलने आतापर्यंत ३२६ षटकार मारले असून, त्याचा हा विक्रम मोडणे कोणत्याही फलंदाजासाठी अवघड असेल.
आयपीएलमधील सर्वाधिक विजयाचा विक्रम सुद्धा धोनीच्या नावावर आहे. कर्णधार म्हणून त्याने १०४ सामन्यात विजय मिळवला आहे. तसेच १००पेक्षा अधिक सामने जिंकणारा धोनी हा एकमेव कर्णधार आहे. स्टपिंगमध्ये सुद्धा धोनी आघाडीवर असून ३८ वेळा त्याने स्टंप केले आहे. तर विकेटकिपर म्हणून त्याने १३२ विकेट घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये हा एक विक्रम आहे.