शिक्षण महर्षी प्रतापराव उर्फ आबासाहेब तोरसकर यांचे निधन!
शिक्षण महर्षी प्रतापराव उर्फ आबासाहेब तोरसकर यांचे आज गुरुवार दिनांक २६ ऑगस्ट रोजी सकाळी सव्वा दहा वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. शिवाजी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आणि धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई चे मा. कार्याध्यक्ष शिक्षण महर्षी आबासाहेब तोरसकर अखेरच्या श्वासापर्यंत सार्वजनिक क्षेत्रात धडाडीने कार्यरत होते. आजही विद्यार्थी आणि शिक्षणक्षेत्र यांच्याशी संबंधित अनेक अभिनव योजनांवर ते अथक काम करत होते. सावंतवाडी, दोडामार्ग आणि मुंबई असे कार्यक्षेत्र असलेल्या धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी बंद पडलेल्या शाळा चालवायला घेतल्या, आवश्यकता भासेल तेथे नवीन शाळा सुरु केल्या, कनिष्ठ महाविद्यालयांची स्थापना केली. या माध्यमातून स्थानिक नागरिकांच्या मदतीने कोकणातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना किमान शिक्षण घेण्याची सोय उपलब्ध करुन दिली. बांदा येथे दरवर्षी संपन्न होणारे “कुमार साहित्य संमेलन” आणि “जिल्हा क्रीडा स्पर्धा” हे केवळ जिल्ह्यातच नव्हे तर राज्यस्तरावर नावाजण्यात आलेले आणि शासन दरबारी दखल घेण्यात आलेले उपक्रम ही आबासाहेबांच्या दूरदृष्टीची देणगी आहे.
सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक वारसा लाभलेल्या तोरसकरांच्या घरात आबासाहेबांचा जन्म झाला. त्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या बळावर आपल्या घराण्याचे नाव अधिक उंचावले. खरे तर असे कोणतेही क्षेत्र नव्हते ज्या क्षेत्राला त्यांनी स्पर्श केला नाही परंतु प्रामुख्याने शिक्षण, क्रीडा आणि कला या दोन क्षेत्रांमध्ये त्यांनी केलेली कामगिरी अतुलनीय आहे. होतकरू विद्यार्थ्यांच्या कला, गुण आणि कौशल्य यांना वाव देण्यासाठी त्यांनी नेहमीच काळाची पावले ओळखून कार्याची पायाभरणी करण्याला प्राधान्य दिले.
समाजाच्या सर्व स्तरातील आणि सर्व वयोगटातील लोकांना एकत्र घेऊन काम करण्याची त्यांची हातोटी अत्यंत कौतुकास्पद होती. त्यांच्या निधनाने शिक्षण आणि कला जगतात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी त्यांचे सहकारी, पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच नाट्य-सिनेकलाकार अशी विविध क्षेत्रातील मंडळी आवर्जून उपस्थित होती. आबासाहेबांच्या कार्यकर्तृत्वाचा सुगंध त्यांच्या स्मृतींच्या रुपाने कायम दरवळत राहील आणि विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थांना कार्य करण्याची योग्य प्रेरणा देत राहील यात शंकाच नाही नाही.
आबासाहेबांच्या पश्चात केवळ त्यांचा परिवारच नाही तर त्यांनी आपल्या गुणांनी जोडलेली असंख्य जिवाभावाची माणसेही आहेत आणि हे त्यांचे विस्तारीत कुटुंब त्यांचे कार्य अजरामर ठेवण्यासाठी कटिबद्ध आहे!