जागतिक “सा क व्य” विकास मंचचे सदस्य कवी श्रीकांत सांबारी यांची कविता….
गुंफिलेल्या सोनक्षणांची करितो गाठवण |
आज येते खूप; सखी तुझी आठवण || धृ.||
घालविल्या त्या कातरवेळा सागरतीरी |
वचने दिधली आणि घेतली रम्य किनारी |
तेव्हा नव्हती जाणीव ; क्षण ते पावन |
आज येते खूप; सखी तुझी आठवण || १ ||
नदीकिनारी मारलेला तो फेरफटका |
घेऊन हात हाती घालविलेल्या घटका |
मुलायम त्या स्पर्शासाठी अधीर हे मन
आज येते खूप; सखी तुझी आठवण || २ ||
पावसातला मातीचा तो मोहक वास |
अन् त्यातला छत्रीविना तुझा सहवास |
विसरू कसे श्रावणातले ते ओलेते क्षण
आज येते खूप; सखी तुझी आठवण || ३ ||
अशक्य आहे या जन्मीतरी तुला विसरणे |
‘ शक्ती’विणा माझे ते अपूर्ण असणे |
वाट पाहीन केवळ तुझीच ; आजीवन
आज येते खूप; सखी तुझी आठवण || ४ ||
श्री.मंदार श्रीकांत सांबारी.
मु पो.आचरा. ता मालवण.
जि.सिंधुदुर्ग . पिन-४१६६१४.
मोबा. ९४२०७९९०७६.