एकट्या महिलांनी फिरायला जायचे कसे? :- महिलांचा सवाल
सावंतवाडीचा नरेंद्र डोंगर पर्यटनदृष्ट्या विकसित करण्याच्या वल्गना बऱ्याचदा झाल्या, परंतु त्या कागदावर आणि घोषणेतच विरून गेल्या. पर्यटक जरी नरेंद्र डोंगरावर मोठ्या प्रमाणावर जात नसले तरी सावंतवाडीतील अनेक लोक, वयोवृद्ध, स्त्रिया दररोज सकाळ संध्याकाळ व्यायामासाठी, चालण्यासाठी जातात. कित्येक स्त्रिया सावंतवाडीतील मनमोकळ्या वातावरणामुळे अगदी निर्धास्तपणे डोंगरावर जातात.
रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी मात्र नरेंद्र डोंगरावर जाणाऱ्या काही महिलांनी जे दृश्य पाहिले त्यामुळे त्यांच्या मनात भीतीची पाल चुकचुकली. लिंबू विक्रेता एक तरुण व त्याच्यासोबत बाहेरचावाडा येथील काही युवक अगदी सकाळच्या वेळीच डोंगराच्या पायथ्याजवळ कार उभी करून डीजे लावून दारू पीत धिंगाणा घालत होते. दारूच्या नशेत असणाऱ्या या युवकांना पाहून स्त्रियांच्या मनात मात्र भीती उत्पन्न झाली. त्यामुळे सकाळच्या प्रहरी नरेंद्र डोंगरावर फिरायला जाणाऱ्या महिलांनी संवाद मीडियाशी संपर्क साधत सावंतवाडीतील या धिंगाणा घालणाऱ्या युवकांविषयी नाराजी व्यक्त केली.
लोक फिरण्यासाठी, देवदर्शनासाठी नरेंद्र डोंगरावर आस्थेने, श्रद्धेने जातात अशावेळी शहरातील तरुण युवक दारू पिऊन भीतीयुक्त वातावरण निर्माण करतात त्यामुळे दररोज नरेंद्र डोंगरावर जाणाऱ्या महिलांनी आम्ही एकट्याने नरेन्द्रावर जायचे कसे? असा प्रश्न उपस्थित केला आहे. सावंतवाडीत पोलिसांच्या दुर्लक्षामुळेच निर्भीडपणे दारू, गांजा विक्री करण्यासारखी प्रकाराने घडत आहेत. पोलीस प्रशासनाने शहरात घडणाऱ्या अवैध धंद्यांकडे वेळीच लक्ष देऊन शहरातील निर्जन ठिकाणी दारू, गांजाच्या होणाऱ्या पार्ट्यांवर कारवाई करावी. अन्यथा आज नरेंद्र डोंगरावर सकाळी सुद्धा युवक दारू पिऊन धिंगाणा घालतात त्यामुळे महिलांमध्ये भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे. भविष्यात शहरातील चौकात देखील अशी निर्धास्त असणारी व्यसनी मुले दारू पिऊन धिंगाणा घालायला मागेपुढे पाहणार नाहीत आणि अशावेळी वेळ निघून गेलेली असेल.