ग्राहकांनी सावधानता घ्यावी, ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे आवाहन.
वैभववाडी.
सुप्रसिद्ध डिपार्टमेंटल स्टोअर्स डिमार्ट च्या 20 व्या वर्धापन दिनानिमित्त फ्री गिफ्ट मिळावा असे आमिष दाखवणारी एक लिंक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी या लिंकवर क्लिक करून आपल्या बँक खात्यासंबंधी माहिती भरल्याने खात्यातील रक्कम गेल्याच्या घटना रत्नागिरीत घडल्याची बातमी प्रसिद्ध झाली आहे.
अशा खोट्या अफवा किंवा लिंकवरून फसवणूक होऊ नये म्हणून सावधानता घेण्याचे आवाहन ग्राहक पंचायत महाराष्ट्र, कोकण विभाग सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने करण्यात येत आहे. अशा खोट्या अफवा किंवा लिंकच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक करण्याचा हा नवा मार्ग आहे.नागरिकांनी वेळीच सावध होत अशा लिंक व्हायरल करू नये व क्लिक करून कोणतीही माहिती भरू नये. या लिंकवर विश्वास ठेवून रत्नागिरीतील अनेकांची फसगत झाली असल्याचे निदर्शनास येत आहे.
या तंत्रज्ञान युगात घर बसल्या आर्थिक फसवणुकीचा हा नवा फंडा असून सर्वांनी यापासून सावधानता बाळगावी असे आवाहन ग्राहक पंचायत महाराष्ट्र, कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रा.श्री. एस.एन. पाटील, उपाध्यक्ष श्री. एकनाथ गावडे, संघटक श्री.सीताराम उर्फ दादा कुडतरकर व सचिव श्री. संदेश तुळसणकर यांनी केले आहे.