*साटेली मायनिंगच्या दुर्घटनेस जबाबदार कोण?*
सावंतवाडी :
मागील काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसात कळणे येथील मायनिंगची खाण कोसळली आणि त्यात कळणे गावातील लोकांचे अतोनात नुकसान झाले, गावातील बारमाही वाहणाऱ्या नदीत गाळ मिश्रित पाणी गेल्याने पाणी नागरिकांच्या वापरास हानिकारक झाले होते. कळणे येथील कोसळलेल्या खाणीचा गाजावाजा झाला परंतु त्याचवेळी *साटेली येथे असलेल्या सर्व्हे नंबर ४०/१२, ५२/१२ खाणींचे देखील भले मोठे भाग दोन ठिकाणी कोसळले आणि माती मिश्रित पाणी, गाळ गावातील काही घरांमध्ये गेला, काही बागायती मध्येही गाळ भरला, शेतीचे देखील अतोनात नुकसान झाले आणि साटेली येथून सातार्डाच्या दिशेने बारमाही वाहणाऱ्या नदीच्या पात्रात बऱ्याच मोठ्या प्रमाणावर गाळ भरल्याने नदीचे पात्रच बुजले आहे*, त्यामुळे पुढे वाहणारा प्रवाहच बंद झाला आहे. त्यामुळे भविष्यात सातार्डा येथे होणाऱ्या वायंगणी शेतीचे देखील नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. सातार्डा येथील शेती पाण्याविना सुकणार तर साटेली येथील शेती मायनिंग ओर गेल्यामुळे कुजणार. *ज्या जमिनीत मायनिंगची माती गेली त्यात भविष्यात झाड होणार नाहीच परंतु चार देखील रुजणार नाही.* साटेली मायनिंग मधील मोठ्या प्रमाणात डंपिंग करून ठेवलेला रिजेक्शन झालेला मायनिंगचा माल देखील भविष्यात कोसळून जवळपास १५ घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता गावातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. कळणे मायनिंग पेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात साटेली माईन कोसळली आहे, नुकसान देखील कित्येक पटीने झाले आहे, परंतु त्याची वाच्यता बाहेर करण्यात आलेली नाही.
साटेली येथील लोकांनी, जमीनदारांनी तहसीलदार पासून जिल्हा खनिजकर्म अधिकाऱ्यांकडे रीतसर तक्रारी दाखल करून पाहणी करण्यासाठी दोघांनी एकत्रच यावे अशी मागणी केली होती. सावंतवाडी तहसीलदार व जिल्हा खनिजकर्म अधिकारी (DMO) यांनी कोसळलेल्या खाणीची व नुकसानीची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. खाण कोसळून नदीत वाहून आलेल्या मातीने भरलेली नदी पाहून सदरचे काम आपल्या आवाक्यातले नाही असे DMO नी लोकांना सांगितले. साटेली येथील घरांचे, शेती, बागायतीचे नुकसान झाले परंतु अजूनपर्यंत कोणावरही का केसेस दाखल झाल्या नाहीत? याचे मात्र उत्तर कोणाकडेही नाही. साटेली नदीतील गाळ काढण्यासाठी व लोकांची नुकसानभरपाई देण्यासाठी कंपनीला नोटीस देणार असे तहसीलदार आणि खनिजकर्म अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
साटेली येथील खाण कोसळून नुकसान झालेल्या एका जमीन मालकाने संदीप नामक कंपनीच्या जबाबदार व्यक्तीस आपली नुकसानभरपाई न दिल्यास सर्व माईन बंद करणार असा इशारा दिला. आपण म्हणजे कळणेवासीय नसून आपल्याला कायदे माहिती आहेत, त्यामुळे आपण सुप्रीम कोर्टात देखील जाऊ शकतो असे सुनावले.. रेडी येथील माईन कित्येकवर्षे सुरू आहे, तिथे अशा घटना घडत नाहीत, त्यांचे कामाचे कसब पाहण्यासारखे आहे. साटेली, कळणे येथील काम हे धोकादायक पद्धतीने केले जाते याचा प्रत्यय दोन्ही ठिकाणी कोसळलेल्या खाणींवरून दिसून आला. साटेली वासीयांना खाणी बंद व्हाव्यात असे वाटत नाही कारण त्यावर अनेकांचे रोजगार चालतात, परंतु लोकांच्या जीवितास, शेती, बागायती, घरांना नुकसान होईल असे काम खाण कंपन्यांनी करू नये, लोकांची झालेली नुकसानभरपाई देखील कंपन्यांनी रीतसर द्यावी असे त्यांचे म्हणणे आहे.
कळणे येथील खाण कोसळली त्याचा भरपूर गाजावाजा झाला, लोकांनी आवाज उठवले, सोशल मीडिया, प्रिंट मीडियामध्ये देखील मोठमोठ्या बातम्या छापून आल्या. परंतु साटेली येथील मायनिंगची खाण दोन ठिकाणी कळणे पेक्षाही मोठया प्रमाणावर कोसळली, नुकसान देखील भरपूर झाले परंतु त्याबद्दल सोशल मीडियावर किवा प्रिंट मीडियामध्ये बातमी का छापून आली नाही? *वार्ताहर, पत्रकारांना सावंतवाडी तालुक्यातील साटेली गावच माहिती नाही की काय?* असा प्रश्न साटेली वासीय उपस्थित करत आहेत.