सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये खाजगी फायनान्स कंपन्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून, आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडीया च्या निर्देशा प्रमाणे वसुली, गाडी जप्ती, हप्ते भरणा जरुर करावी… परंतु सध्या स्थितीत कर्जदारांना दमदाटी,अरेरावी मानसिक त्रास दिला जातो आहे.. अशा अनेक तक्रारी मनसेकडे प्राप्त झाल्या. तसेच आज पर्यंत नैराश्येतुन तिन आत्महत्या सिंधुदुर्गात झाल्या या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या नेतृत्वाखालील गणेश वाईरकर माजी तालुकाध्यक्ष मालवण, प्रथमेश धुरी, सागर सावंत, रोहीत नाईक,दत्ताराम सावंत या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राजेंद्र दाभाडे यांची भेट घेतली. व तक्रारीचा पाढाच वाचला. करोना काळात मागील दोन वर्षापासून जगभरातील आर्थिक घडी विस्कटली आहे. लाॅकडाऊन सारख्या निर्णयाने नोकरदार, उद्योजक, व्यवसायिक यांचे धंदे आर्थिक परिस्थिती हालाखीची बनली आहे.. त्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खाजगी फायनान्स कंपन्याच्या ह्या दमदाटी अरेरावीने कर्जदार त्रासले आहेत. अशा नियमबाह्य पद्धतीने चाललेला प्रकार त्वरित थांबवावा. संबंधित कंपन्यांना कायदेविषयक मार्गदर्शन करावे अशी मागणी आज मनसे शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांना भेटून केली .. या वर फायनान्स कंपन्यानी आपल्या वागणुकीत सुधारणा न केल्यास फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांमध्ये कार्यक्रम करू असे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी सांगितल आहे.