– पालकमंत्री उदय सामंत
सिंधुदुर्गनगरी
रानभाज्यांचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. माणूस मांसाहार कडून शाकाहारी होत आहे. त्यामुळे रानभाजी पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे गरज आहे. कोविडचे सर्व नियम पाळून गावठी आठवडा बाजार येत्या आठ दिवसात सुरु करा, अशी सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी कुडाळ येथे सुरू असलेल्या दोन दिवसीय रानभाजी व वन औषधी वनस्पती महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात केली.
यावेळी व्यासपीठावर आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, जिल्हा कृषि अधिक्षक सिधान्ना म्हेत्रे, पद्मश्री परशुराम गंगावणे, संजय पडते, अतुल रावराणे, संदेश पारकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे काका कुडाळकर, भास्कर परब, सर्फराज नाईक आदी उपस्थित होते.
यावेळी ते पुढे म्हणाले, आजपर्यंत मी रानभाजी महोत्सव कधी पाहिला नाही परंतु येथे येण्याची संधी वैभव नाईक यांनी दिली. येथे केवळ प्रदर्शन पाहिले नाही तर त्याचा आस्वाद घेतला. चिकनचिली पेक्षा बांबूच्या कोमाची चिली फार चांगली लागली. रानभाज्यांमुळे आपले शरीर तंदुरुस्त रहाते. हे सर्वांनी लक्षात घेऊन त्याचा आहारात वापर करा, असे आवाहन यावेळी केले. येथील आठवडा बाजार कोरोनामुळे बंद आहेत ते जिल्हाधिकारी यांनी लवकरच सुरु करण्याच्या सूचना यावेळी दिली.
यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आयोजकांनी कोविडचे नियम पाळून नियोजन केल्याबद्दल कौतुक केले. यावेळी विद्यार्थी गुणगौरव, तसेच प्रगतीशील शेतकरी, उत्कृष्ट कार्य केलेल्या कर्मचाऱ्यांचा तसेच लोक कलाकार पद्मश्री परशुराम गंगावणे यांचा सत्कार करण्यात आला.