पालकमंत्री उदय सामंत यांनी सुनावले खडे बोल
नितेश राणे आमच्या बद्दल वाईट बोलले की आमची अर्थात शिवसेनेची मते वाढतात. त्यांनी आमच्याबद्दल वाईट बोलतच राहिले पाहिजे ह्यात भाजपचे नुकसान आणि शिवसेनेचा फायदा आहे. स्वतःची नसलेली राजकीय उंची वाढवण्याचाच नितेश राणेंचा केविलवाणा प्रयत्न असल्याचे खडे बोल सिंधुदुर्ग चे पालकमंत्री उदय सामंत यांनी आमदार नितेश राणेंना सुनावले आहेत. नितेश राणेंनी भाजपात नसताना आजपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी, वंदनीय बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस ला रामराम केल्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही वैयक्तिक टीका केली होती.. नितेश राणे नेहमी आपल्या पेक्षा जास्त राजकीय वजनदार व्यक्तीवर टीका करतात. त्यामुळे नितेश राणेंनी माझ्यावर टीका करून मला त्या पंक्तीत बसवले त्याबद्दल त्यांचे आभार. राहिला प्रश्न त्यांनी किरण सामंत यांच्यावर टीका केलेल्या पत्रकार परिषदेचा. त्याला आमचे कणकवलीचे माजी नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी फार छान उत्तर दिलं आहे. मला परत त्यावर उत्तर देऊन नितेश राणेंना मोठं करायचं नाही. कुणीही कितीही टीका करू दे. सिंधुदुर्गच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे. त्यांनी माझ्या बद्दल किंवा मोठ्या भावाबद्दल जी टीका केली आहे ती किती खरी आणि किती खोटी आहे हे सिंधुदुर्ग वासीयांना माहीत आहे. आणि त्याचा सविस्तर खुलासा संदेश पारकर यांनी केला आहे.. तरीही त्यांना माझ्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. अशा शब्दांत आमदार नितेश राणेंना खिजगणतीत न धरता पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रत्यत्तर दिले आहे.