पहिल्या पाच क्रमांकात जिल्ह्याचे नाव राहील – पालकमंत्री उदय सामंत
सिंधुदुर्गनगरी
भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष राज्यभर 15 ऑगस्ट 2023 पर्यंत विविध कार्यक्रमांनी साजरे करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिक, लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्यातून हा महोत्सव साजरा करताना पहिल्या 5 क्रमांकात जिल्ह्याचे नाव राहील अशा पद्धतीने काम करूया, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
येथील पोलीस कवायत मैदानावर, भारतीय स्वातंत्र्याच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख व नागरिक उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. सामंत यांनी, देशाची एकता अखंडता, स्वातंत्र्य आणि सार्वभौमता राखण्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्या शूर सैनिकांना आणि वीर पुत्रांना आदरांजली अर्पण करून जिल्हा वासियांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष सर्वांच्या सहकार्याने विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पहिल्या पाच क्रमांकात जिल्ह्याचे नाव राहील अशा पद्धतीने सर्वांनी योगदान देऊन काम करुया असेही ते म्हणाले.
यावेळी पोलीस दलाने मानवंदना दिली. यानंतर पालकमंत्री श्री. सामंत यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी, नागरिक यांना भेटून शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा रुग्णालय व आरोग्य विभागातील कोविड काळाच उत्कृष्ट काम करणारे डॉक्टर्स व कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला. जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. श्याम पाटील, डॉ. परमेश्वरी रेड्डी, परिचारीका मानसी गावडे, संतोषी देसाई, गितांजली झोरे, वाहन चालक केतन पारकर, संदीप कदम, सचिन परब, सफाई कामगार विश्राम जाधव, मानसी वेझरे, सुनिल तांडेल यांना सन्मानित करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कुडाळचे तालुका आरोग्य अधिकारी संदेश कांबळे, पणदूरच्या आरोग्य सहाय्यिका कुंदा पवार, कुडाळ आरोग्य अधिकारी कार्यालयातील आरोग्य सहाय्यक चंद्रशेखर नाईक, प्राथमिक आरोग्य केंद्र गोळवण, उपकेंद्र सुकळवाडच्या आरोग्य सेविका ग्लोरिया व्रिटो, प्राथमिक आरोग्य केंद्र वरवडे उपकेंद्र कलमठचे आरोग्य सेवक चंद्रमनी कदम यांचाही सन्मान करण्यात आला. महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या एस.एस.पी.एम. रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि गोवा मेडिकल कॉलेज या रुग्णालयांचाही गौरव करण्यात आला.