You are currently viewing हाताची घडी तोंडावर बोट – नेहमी शिक्षक “दीन”च !!

हाताची घडी तोंडावर बोट – नेहमी शिक्षक “दीन”च !!

अन्यायाविरोधात पुढे येण्याची गरज, लढ्यात आम्ही सोबत राहू : अविनाश पराडकर आणि सहकाऱ्यांनी दिला विश्वास

काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही, हे श्रीधर फडकेंचे मौन सूर सध्या अनेक शिक्षकांच्या गळ्यात अडकलेले आहेत. नाशिकच्या शिक्षणाधिकारी वैशाली वीर यांच्या प्रतापाबद्दलची पोस्ट लिहिली आणि त्याखाली, आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील “छुपे वीर” शोधण्याची गरज आहे… बदलीसह इतर विषयांची होती खमंग चर्चा” म्हंटल्यावर सिंधुदुर्गात अनेक ग्रुपवर चर्चा तर झाली, पण त्यातली बहुतांशी चर्चा ही शिक्षक संघटनांच्या खाजगी ग्रुपवरच होती. आमच्या एका चांगल्या शिक्षक मित्राच्या सौजन्याने त्या आमच्यापर्यंत पोहोचल्या, तेव्हा कळलं की भ्रष्टाचाराचा पूर सिंधुदुर्ग जिल्ह्यातही किती मोठा आहे आणि या पवित्र क्षेत्रातही बेलगामशाहीचा किती चिखल होऊन बसला आहे. शिक्षकांचे प्रश्न मांडायला शिक्षक संघटना आहेत, पण त्याचे प्रतिनिधी हे सुद्धा शिक्षकच असतात. ज्या सिस्टीमच्या हातात आपली शेंडी असते, त्या सिस्टिमच्या विरोधात कोणता योद्धा किती लढणार? वास्तव स्वीकारावेच लागेल.

जिथे शिक्षकच मानसिकरित्या सुदृढ राहू शकत नसेल तिथे खरेच नवी पिढी घडेल? मुकी बिचारी कोणीही हाका अशी शिक्षकांची अवस्था झाली आहे. वर्षातून एक दिवस “शिक्षक दिन” असतो आणि इतर प्रत्येक दिवशी शिक्षक “दीन” असतो.

लेखाच्या निमित्ताने संघटनेच्या ग्रुपवर का होईना… लिहिते झालेल्या शिक्षकांचे आभार! आज तिथे धूर आहे हे चांगलेच आहे, आग पकडणे वाऱ्यावर अवलंबून असते. आणि मला विश्वास आहे गेली काही वर्षे हवा बदलत चालली आहे. आगीचेही दिवस येतील!!

आज अनेक शिक्षकांचे म्हणजे आहे की जो ज्या फिल्डवर असतो तिथले भोग त्यालाच माहिती असतात आणि साम, दाम, दंड, भेद या सगळ्यासकट लढायला शिक्षक सगळ्या अँगलनी सक्षम नसतो. संस्था, शिक्षण विभाग, संचालक कार्यालय सगळ्या ठिकाणचे संतापजनक किस्सेही यानिमित्ताने चर्चेतून कळले.

एक गोष्ट सांगावीशी वाटते की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त दोषी असतो. हे आम्हीही शाळेतच शिकलो, मग हे शिकवणारे शिक्षक एवढे हतबल का?

कारणे काहीही असो, पण अन्यायाविरोधात लढायला हवेच. सुदैवाने महाराष्ट्राला गनिमी काव्याची देन आहे. सुलतान ढवा करायचा आमचाही आग्रह नाही.

गेली काही वर्षे आम्ही सर्वजण अन्यायग्रस्त कर्जदारांच्या विरोधात बलाढ्य बँकांशी समर्थपणे लढतो आहोत.. अन्यायाला नडत अनेकांना न्याय मिळवून देत आहोत.

शिक्षकांवरच्या अन्यायाविरोधात लढण्यासाठी जिथे आमची मदत लागेल, तिथे आम्ही तुमच्यासाठी पुढे आहोत. आजवर आम्ही कसलाच आणि कोणाचाही दबाव मानला नाही आणि कसल्याच प्रलोभनांना बळी पडलो नाही. शिक्षकांच्या न्यायाच्या लढ्यातही आम्ही तुमच्यासोबत नक्कीच राहू! आज चर्चेत आलेल्या नाशिकच्या शिक्षणाधिकारी आणि प्राथमिक शिक्षक दशपुते ही कदाचित कोणाची तरी प्यादीही असू शकतील, ज्याच्या सिस्टीमला त्या विरोध करू शकल्या नसतील आणि हा चिखल त्यांनी स्वतःला लावून घेणे पसंत केले असेल. पण शेवटी बळी त्यांनाच ठरावे लागणार हेही अंतिम सत्य आहे. वाहून जाण्याऐवजी वेळीच या प्रवाहात पाय रोवायची गरज असते आणि त्यासाठी… आम्ही सोबत आहोत! गनिमी कावा तुमचा आणि सुलतान ढवा आमचा!!

आपल्या विरोधातल्या अन्यायाविरोधात नक्की बोला, पण चुकीच्या गोष्टी अजिबात सहन करू नका! एक इतक्या वर्षांच्या विश्वासासह ठामपणे सांगतो, की जिथे तुमच्या नावाची गुप्तता राखायची गरज असेल, तिथे आम्ही शंभर टक्के सेफ्टी लॉकर राहू! फक्त, खूप उशीर होण्याआधी आणि काही भ्रष्टासूर खूपच माजण्याआधी… बोला!! काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही हे गीत ऐकायलाच बरे… आचरणात त्याचा त्रासच होणार आहे हे निश्चित!

अविनाश पराडकर यांच्याशी संपर्क करण्यासाठी मोबाईल क्रमांक 9422957575

प्रतिक्रिया व्यक्त करा