शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे शंभराव्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यांच्या वाढदिवसाला पंतप्रधान मोदी ते भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि राज ठाकरे ते राज्यपाल कोश्यारींसह दिग्गज मान्यवर हजेरी लावणार आहेत. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.
आज 13 ऑगस्टला बाबासाहेब पुरंदरे तिथीप्रमाणे वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यानिमित्ताने लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन पद्धतीने उपस्थिती लावणार आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंद्वारे मोदी पुरंदरेंना ऑनलाईन शुभेच्छा देणार आहेत.
पंतप्रधान मोदींबरोबर, सरसंघचालक मोहन भागवत, भारतरत्न सचिन तेंडुलकर, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ऑनलाइन पद्धतीने या कार्यक्रमात सहभागी होतील.
तर उद्या म्हणजेच 14 ऑगस्टला ज्येष्ठ गायिका आशा भोसले आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होईल. 15 ऑगस्टला राज्यपाल भगतसिंग कोशारी शिवसृष्टीला भेट देणार आहे. यावेळी पुरंदरेंना ते वाढदिवसाच्या शुभेच्छा देतील, अशी माहिती सत्कार समारोह समितीचे अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली.