You are currently viewing १२ ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिन; युवकांचा आवाज जगभरात पोहोचवण्याची एक संधी

१२ ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिन; युवकांचा आवाज जगभरात पोहोचवण्याची एक संधी

आंतरराष्ट्रीय युवा दिवस ही जागतिक पातळीवर विविध उपक्रमांद्वारे युवकांचा आवाज जगभरात पोहोचवण्याची एक संधी आहे. १२ ऑगस्ट रोजी जगभरात हा आंतरराष्ट्रीय युवा दिवस साजरा केला जातो. भारतासाठी तर हा दिवस अधिक खास आहे. कारण, भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे. आपल्याला सर्वांनाच माहित आहे कि, भारतात २५ वर्षांपेक्षा कमी वयाचे ५० टक्क्यांपेक्षा जास्त तरुण आहेत. तर ३५ वर्षांपेक्षा कमी वय असलेले ६५ टक्क्यांपेक्षा जास्त तरुण आहेत. कोणत्याही देशाचं भविष्य हे त्या देशातील तरुणांवर अवलंबून असतं, असं मानलं जातं. तरुणांवर ही इतकी मोठी जबाबदारी आहे. त्याचसोबत त्यांच्यात तितकी किती ताकद आहे हे आपल्या लक्षात येईल. त्यांची विचारधारा, मूल्य, प्रगती, प्रत्येक कृती, निर्णय, प्रत्येक पाऊल हे उद्याचा देश घडवत असतं. म्हणूनच आपल्या देशाच्या, समाजाच्या प्रगतीमध्ये मोठे भागीदार असलेल्या आपल्या युवकांना योग्य आणि निर्भीड मार्गदर्शनाची गरज आहे.

👉 *आंतरराष्ट्रीय युवा दिवस कधी आणि का साजरा केला जातो?*
१७ ऑगस्ट १९९९ रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने आंतरराष्ट्रीय युवा दिवस १२ ऑगस्ट रोजी साजरा करण्याचा निर्णय घेतला. युवकांसाठी जबाबदार मंत्र्यांच्या जागतिक परिषदेने १९९८ मध्ये केलेल्या सूचनेनंतर हा निर्णय घेतला होता. आंतरराष्ट्रीय युवा दिवस सर्वात पहिल्यांदा २००० मध्ये आयोजित करण्यात आला होता.

👉 *आंतरराष्ट्रीय युवा दिवस कसा साजरा केला जातो?*
दरवर्षी या दिवशी संयुक्त राष्ट्र एक थीम निवडते. या थीमनुसार, जगभरातील युवकांसाठी युवकांद्वारे अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. साधारणतः या कार्यक्रमांमध्ये जागरूकता मोहिमा, सामुदायिक मैफिली आणि कार्यक्रम, परेड, प्रदर्शन यांचा समावेश असतो. याशिवाय विविध माध्यमांद्वारे जगभरातील तरुणांशी संवाद साधला देखील जातो.

👉 *आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे उद्दिष्ट*
आंतरराष्ट्रीय युवा दिवसाचा मुख्य उद्देश हा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विषयांवर तरुणांचा सहभाग आणि भूमिका यावर चर्चा करणे आहे.

*आंतरराष्ट्रीय युवा दिन २०२१ थीम*
प्रत्येक वर्षी संयुक्त राष्ट्र सर्व जागतिक समुदाय आणि नागरिकांसाठी संबंधित थीम ठरवते. आंतरराष्ट्रीय युवा दिवसाची या वर्षीची थीम “ट्रान्सफॉर्मिंग फूड सिस्टम्स: युथ इनोव्हेशन फॉर ह्युमन अँड प्लॅनेटरी हेल्थ” ही आहे. यासह इतर आव्हानं देखील आहेत. उदा. हवामान बदल, आरोग्यसेवा, सामाजिक समावेश आणि जैवविविधतेचे संवर्धन हे प्रश्न देखील सोडवले जातील.

आंतरराष्ट्रीय युवा दिनाचं महत्त्व काय? तर या दिवशी जगभरातील सरकारे आणि युवक एकत्र येतात आणि आपल्याला भेडसावणाऱ्या समस्यांकडे जगाचं लक्ष वेधतात. प्रत्येक राष्ट्रातील तरुणांना भेडसावणाऱ्या सामाजिक – आर्थिक आणि सामाजिक – राजकीय समस्या लक्षात आणण्यासाठी विविध जागरूकता मोहिमा, सामुदायिक मैफिली आणि कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.

प्रतिक्रिया व्यक्त करा