शिक्षण-आरोग्य सभापती डॉ.सौ.दळवी यांनी दिले आदेश
सिंधुदुर्गनगरी
जिल्हयातील पूरग्रस्त भागात पूरपश्चात विविध आजार पसरू न देण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना आरोग्य विभागाकडून सुरू करण्यात आल्या आहेत. पुढिल ७ दिवस प्रत्येक पुरग्रस्त भागात गावस्तरावर आरोग्य तपासणी केली जाणार आहे अशी माहिती जिल्हा परिषद शिक्षण आरोग्य सभापती डॉ.सौ.अनिशा दळवी यांनी दिली.
पुराच्या पाण्यामुळे अनेक ठिकाणी दलदल पसरलेली आहे. तसेच डास, मृत जनावरे, इतर मृत प्राणी यांच्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाकडून गावात निर्जंतूकीकरण फवारणी, ब्लीचींग पावडर टाकणे, नालीमध्ये औषधी टाकणे, आरोग्य कॅम्प लावणे तसेच आजार प्रतिबंधात्मक औषधांचे वाटप करणे अशी कामे सुरू करण्यात आली आहेत. गावांमध्ये याबाबत उपाययोजना राबविल्या जात आहेत.
ग्रामपंचायतीची भूमिका महत्वाची : पूर भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपल्या परिसरातील नागरिकांना पूर पश्चात उद्भवणाऱ्या रोगांबाबत तसेच घ्यावयाच्या काळजीबाबत नागरिकांमध्ये जणजागृती करणे आवश्यक आहे. यासाठी वार्डनिहाय दवंडी देणे, सूचना फलकावर माहिती देणे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी पदाधिकारी यांनी प्रत्यक्ष पूर बाधितांना भेटून माहिती देणे गरजेचे आहे.
जलजन्य, किटकजन्य व इतर आजारांवर नियंत्रण: पाण्यामुळे होणारे रोग आटोक्यात आणण्यासाठी सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत स्वच्छ करणे, त्यांचे क्लोरीनेशन करणे आवश्यक आहे. त्यांनतरच सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत वापरावेत. घरातील पिण्याचे पाणी उकळून थंड करून पिणे आवश्यक आहे. उघडयावरील पूराच्या पाण्यामुळे डास प्रजनन प्रक्रिया वाढते. त्यामुळे डासांवर नियंत्रण मिळविण्यासाठी उघडयावरील साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावणे, प्रतिबंधात्मक पावडरची फवारणी करणे गरजेचे आहे. डास चावू नये म्हणून मच्छरदाणीचा उपयोग केल्यास ते फायदेशीर ठरू शकते.
तसेच सर्पदंश पासून सावधानता बाळगावी. पूर परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात सर्प किंवा अन्य किटकांच्या स्थलांतर झाल्यामुळे त्यांच्यापासून बचाव करणे महत्त्वाचे आहे.
स्वत: लक्षणांबाबत तपासणी करा: गावस्तरावर आरोग्य विभागाचे तपासणी कॅम्प लावण्यात आले आहेत. त्या ठिकाणी दैनंदिन तपासणी करावी असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. तसेच ज्या ठिकाणी कॅम्प नसतील त्याठिकाणच्या नागरिकांनी जवळील आरोग्य केंद्रात भेट द्यावी. कोरोना परिस्थिती आणि पूरपरिस्थितीमुळे प्रत्येकाने आपली स्वत:ची आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे. स्व परिक्षण करत असताना ताप, खोकला, पोट दुखणे, जुलाब असे आजार आंगावर काढू नये.
घर व इमारतींची तपासणी करा : पूर परिस्थितीनंतर पूराच्या पाण्यात भिजलेल्या घर व इमारतींची तपासणी करणे आवश्यक आहे. कुमकूवत घरात व इमारतीमध्ये आश्रय घेणे टाळावे. अर्धे पडलेल्या किंवा जीर्ण झालेल्या घरांची तपासणी ग्रामपंचायत किंवा प्रशासनाकडून करून घ्यावी. घरातील साहित्य किंवा इतर वस्तू घेण्यासाठी घाई न करता काळजी घेणे आवश्यक आहे.
याचबरोबर पशु साथरोग उद्भवन्याची शक्यता आहे. याबाबत जनावरांना काही लक्षणे दिसल्यास पशू वैद्यकीय तज्ञाचा सल्ला घ्यावा.