झाराप – पत्रादेवी महामार्गावरील नेमळे ( कुंभारवाडी) येथे वाहतूक नियंत्रण पोलिस उभे राहून वाहने थांबवतात. त्यामुळे अपघात होतात. डंपर आणि आयशर कंटनेरचा झालेला अपघाताला वाहतूक पोलीस जबाबदार आहेत,हा प्रकार थांबला नाही तर लोकांना घेऊन रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशारा शिवसेना तालुकाप्रमुख तथा पंचायत समिती सदस्य रुपेश राऊळ यांनी दिला आहे.
रुपेश राऊळ म्हणाले, झाराप-पत्रादेवी महामार्गावरील कुंभारवाडी जवळ वाहतूक पोलीस नाका नसताना थांबतात आणि वाहने उभी करतात. पाच ते सहा वाहतूक पोलीस थांबतात. याबाबत वारंवार तक्रार करूनही दखल घेतली जात नाही.आज डंपर तपासणीसाठी थांबवला आणि त्यानंतर त्यावर आयशर कंटनेर धडकला. या भीषण अपघातास सिंधुदुर्ग जिल्हा वाहतूक नियंत्रण पोलिस जबाबदार आहेत.
राऊळ म्हणाले, नेमळे महामार्गावर होणाऱ्या अपघातास वाहतूक पोलिस जबाबदार आहेत. वाहतूक पोलिसांना महामार्गावर कुठेही उभे राहून तपासणी करण्याचा अधिकार नाही, मात्र हे वारंवार नेमळे कुंभारवाडी येथे उभे राहून तपासणी करतात. याबाबत वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली गेलेली नाही. येत्या १४ ऑगस्टला पालकमंत्री उदय सामंत सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असतील त्यावेळी याबाबत सविस्तर माहिती देणार आहोत. वाहतूक पोलिसांच्या महामार्गावरील तपासणीच्या या बेकायदेशीर कृतीची खबरदारी घेतली नाही तर नेमळे गावातील ग्रामस्थांना घेऊन महामार्गावर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राऊळ यांनी दिला.
वाहतूक पोलीस नेमळे या ठिकाणी अचानक वाहने थांबवून तपासणी करतात, त्याचा शेतकऱ्यांना देखील त्रास होतो. वाहतूक पोलिसांनी महामार्गावर कुठेही उभे राहून तपासणी करू नये, त्यामुळे अपघात होतात. म्हणून वरिष्ठांनी त्यांची कानउघडणी करावी तसेच वाहतूक पोलीस अचानक वाहन थांबवतात आणि त्याच्या मागोमाग वेगवान धावणारी वाहने अपघातग्रस्त बनतात, त्याला जबाबदार वाहतूक पोलिस आहे याची दखल जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घ्यावी अशी मागणी देखील तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी केली आहे.