जिल्ह्यातील क्लब बनले मिनी कॅसिनो.
संपूर्ण महाराष्ट्रात क्लब साठी अधिकृत परवाना कोणाकडेही नाही. धर्मादाय आयुक्त जो परवाना देतात तो वयोवृद्ध लोकांना रमी, बुद्धिबळ, कॅरम असे खेळ खेळण्यासाठी. परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यात धर्मादाय आयुक्तांच्या परवान्याचा गैर अर्थ लावून क्लब च्या नावावर जुगाराचे अड्डे रात्रंदिवस सुरू आहेत. धर्मादाय आयुक्तांचा क्लब साठी घेतलेला परवाना फोटो फ्रेम करून क्लब मध्ये लावला जातो व जसा काय आपल्याकडे जुगार खेळण्याचाच परवाना असल्यासारखा जुगाराचा अड्डा चालवला जातो.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या क्लब मध्ये वयोवृद्ध लोकांपेक्षा तरुणच जास्त पाहायला मिळतात. कॅसिनो मध्ये ज्याप्रकारे पैशांच्या जागी कॉईन्स वापरतात त्याच धर्तीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्लब मध्ये कॉईन्स घेऊन जुगार खेळला जातो, त्यामुळे सिंधुदुर्गात मिनी कॅसिनो सुरू झाल्याची चर्चा आहे. काही वर्षांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तत्कालीन पोलीस अधीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्न व डॉ रवींद्र शिसवे यांनी आपल्या कारकिर्दीत सिंधुदुर्गातील अशा रीतीने जुगार खेळणाऱ्या क्लब वर धाडी टाकून क्लब चा पर्दाफाश केला होता. त्यावेळी पोलिसांनी घातलेल्या धाडीमुळे धर्मादाय आयुक्तांच्या परवान्याचा अर्थ लोकांना समजला होता.
गेल्या काही वर्षात पोलीस अधीक्षक बदलले आणि सोशल क्लबच्या गोंडस नावावर मिनी कॅसिनो सुरू झाले. जिल्ह्यात अनेक ठिकाणी असे क्लब सुरू झाले असून सर्वच क्लब मध्ये जुगार खेळला जातो, कणकवलीतील एका लोकप्रतिनिधींनी कणकवली पोलीस स्टेशनला क्लब मध्ये जुगार खेळला जात असल्याने अर्ज दिला होता. परंतु त्यावर कोणतीही कारवाई न केल्याने आंदोलन करून उपोषण करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे कणकवलीत सुरू असलेला तो क्लब बंद करून तळेरे येथे सुरू केला होता. परंतु काहीच दिवसात पुन्हा हा क्लब कणकवली नजीक सुरू करण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असणारे सोशल क्लब खेळाच्या नावावर जुगाराचे अड्डेच चालवीत असल्याचे दिसून येत आहे, जिल्हा पोलिस प्रमुखांचाही अशा सोशल क्लबच्या नावावर सुरू असणाऱ्या अड्डयांवर दुर्लक्ष होत आहे. त्यामुळेच धर्मादाय आयुक्तांचा परवाना फ्रेम करून भिंतीवर अडकवून राजरोसपणे जुगार सुरू आहेत आणि त्यांना आशीर्वाद मात्र पोलिसांचे लाभत आहेत.