मालवण-गवंडीवाडा येथील घटना ; शहरात आत्महत्येची चर्चा, पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद…
मालवण
शहरातील भरड येथील मयुरेश अरुण मालंडकर या (वय-३७) या तरुणाचा पाणी साठवणूकीच्या टाकीवरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी गवंडीवाडा येथे घडली. याबाबत येथील पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान त्याच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीत आजारपणाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे शहरात त्याने आत्महत्या केल्याची चर्चा होती.
भरड येथील मयुरेश मालंडकर याचा मृतदेह आज गवंडीवाडा येथील नळपाणी योजनेच्या पाण्याची टाकी असलेल्या परिसरात आढळून आला. पाण्याच्या टाकीला नायलॉनची दोरी बांधलेली आढळून आली आहे. मयुरेश याच्या खिशात एक चिठ्ठी सापडली. या चिठ्ठीत आपण आजारपणाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. शिवाय माझ्या खिशात एक हजार रुपये असून पहिला जो मला हात लावेल त्याला ते देण्यात यावे. तसेच माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरण्यात येऊ नये असेही मयुरेश याने चिट्ठीत म्हटले आहे. येथील पोलिसांनी मयुरेश मालंडकर याच्या मृत्यूबाबत आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. सहायक पोलिस निरीक्षक भारत फारणे, पोलीस उपनिरीक्षक सचिन पाटील, हवालदार राजन पाटील, सिद्धेश चिपकर, श्री. पांचाळ हे अधिक तपास करत आहेत. मयुरेश याच्या मृत्यूमुळे मित्र परिवारात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ आणि वहिनी, पुतणी असा परिवार आहे