सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक दिक्षितकुमार गेडाम यांची सांगली येथे बदली…
गेली तीन वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षकपदी दिक्षितकुमार गेडाम हे कार्यरत होते. जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून कोणत्याही प्रकारच्या वादात न अडकता सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वसमतोल राखत पोलीस प्रशासनावर चांगली पकड ठेवत अतिशय शिस्तबद्ध कारभार केला होता. जिल्ह्यात आजपर्यंत आलेले कितीतरी पोलीस अधीक्षक हे वादातीत राहिले होते, लोकप्रतिनिधीं असो वा आमदार, मंत्री यांच्यासोबत त्यांचे वाद हे जगजाहीर असायचे. परंतु दिक्षितकुमार गेडाम सिंधुदुर्गात आल्यानंतर लोकप्रतिनिधी आणि पोलीस प्रशासन दोघंही आपापली मर्यादा पाळत कार्यरत होते.
जिल्ह्यातील अवैध्य, बेकायदा दारू, मटक्याचे धंदे मात्र दिक्षितकुमार गेडाम यांच्या कार्यकाळात बऱ्याच प्रमाणात सुरू होते, परंतु गेल्याच काही दिवसांत पोलीस प्रशासनावर आरोप झाल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी मटक्यावाल्यांची धरपकड मोहीम हाती घेतली होती.
आज उशिरा प्राप्त झालेल्या आदेशानुसार दिक्षितकुमार गेडाम यांची सांगली येथे बदली झाली असून त्यांच्या जागी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून पोलीस उपायुक्त गुन्हे विभाग मुंबई येथील राजेंद्र दाभाडे यांची सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधिक्षकपदी नियुक्ती राज्य शासनाच्या गृह विभागाने केली आहे. राज्यातील २२ पोलीस अधीक्षक व पोलीस उपयुक्तांच्या बदल्यांचे आदेश आले आहेत.