कणकवली
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना या आजाराचा प्रादुर्भाव होत असून, जिल्ह्यात सर्वत्र भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात असलेल्या अपुऱ्या आरोग्य सोयीमुळे जिल्ह्यात अनेकांना कोरोना या आजाराने निधन झाले आहे. मनसे यासाठी गेले अनेक महिने अधिकाऱ्यांशी पत्र व्यवहार करत असून, आंदोलने देखील केली आहेत.
परंतु जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधी या सर्वांकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे येथील जनतेचे आरोग्य संकटात सापडले आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतःच स्वतःची काळजी घेणे आता गरजेचे असून, प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पणे पालन करणे गरजेचे बनले आहे. तसेच ज्या ठिकाणी जनता कर्फ्यू लावण्यात येत आहे त्या ठिकाणी देखील नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन मनसे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केले आहे.
गेले सहा महिने खासदार, पालकमंत्री व आमदार यांनी अनेक वेळा अधिकाऱ्याच्या बैठका घेऊन उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव कमी न होता वाढतच चालला आहे. त्यामुळे या लोकप्रतिनिधींना जनतेची काळजी नसल्याचे स्पष्ट दिसत असल्याचे मत माजी आमदार परशुराम उपरकर यांनी मांडले आहे. तसेच जिल्ह्यातील शासकीय व निम शासकीय कार्यालयात कार्यरत असणाऱ्या पर जिल्ह्यातील अधिकारी सुट्टीच्या दिवशी आपल्या मुळ गावी जाऊन पुन्हा कामावर हजर होत असल्याने यावर देखील जिल्हाधिकारी यांनी योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करणार असल्याची माहिती प्रसिद्धीपत्राद्वारे मनसे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिली आहे.