ओठी तुझ्या खुललेलं ते हास्य पाहताना,
मुके होती शब्द अन आसवे बोलू लागती.
सुख तुझ्या मनातलं दिसतं शब्दाशब्दात,
मन माझं चतुर ओळखतं एकाच क्षणात.
हर्ष मनी दाटता ती दुःखेही येतील सोबती,
मुके होती शब्द अन आसवे बोलू लागती.
जीवनी तुझ्या उजळो तेजस्वी प्रकाश सारा,
सुख शांती समृद्धीचा वाहू दे गार गार वारा.
अंधःकार दूर होता दाही दिशा उजळती,
मुके होती शब्द अन आसवे बोलू लागती.
मुखकमल तुझे भासे प्रसन्न मनाचा आरसा,
वादळ वाऱ्याचा नसे मनावर फरक फारसा.
गालावरी लालीत त्या गुलाब पुष्प खुलती,
मुके होती शब्द अन आसवे बोलू लागती.
अस्थिर होई मन विचार अकारण भटकती,
प्रश्न बहू ते सदैव तुझ्या मनात उभे राहती,
नको करू अपेक्षा उत्तराची वेळ येता सुटती.
मुके होती शब्द अन आसवे बोलू लागती.
©{दिपी}
दीपक पटेकर
८४४६७४३१९६