*सर्वसामान्य कार्यकर्ता भेटू शकतो मंत्रालयात मंत्र्यांना*
सिंधुदुर्ग :
सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस नारायण राणे यांच्या पक्ष त्यागानंतर जिल्ह्यात खूपच पिछाडीवर गेली होती. राणेंच्या काँग्रेस प्रवेशाने जिल्ह्यात एक नंबर वर असणारी काँग्रेस राणे बाहेर पडल्यावर पार मोडकळीस आली होती. कट्टर कॉंग्रेसवासी असलेलेच कार्यकर्ते पक्ष संघटनेत राहिले होते. अनेक जुन्या नव्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राणेंच्या नेतृत्वाखाली जिल्हास्तरीय वेगवेगळी पदे भूषविली होती. राणे हेच काँग्रेसमधील आपले नेते त्याव्यतिरिक्त राज्यस्तरीय एकाही नेत्यांशी अथवा मंत्र्यांशी जिल्ह्यातील कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी यांचा संबंध नसायचा. लोकप्रतिनिधीनी आपल्या कामांसाठी केवळ राणेंशीच संपर्क करायचा अशी परिस्थिती राणे काँग्रेसमध्ये असताना होती. त्यामुळे जिल्ह्यातील कोणीही लोकप्रतिनिधी कधी राज्याच्या मंत्र्यांना भेटत नव्हता किंवा मंत्रालयापर्यंत पोहचू शकत नव्हता. राणेंच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याची काँग्रेस असल्याने जिल्ह्यातील कार्यकर्ता मंत्रालयात दिसला तरी राणेंचा त्यांना धाक वाटायचा…
नारायण राणे काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर विकास सावंत या कट्टर काँग्रेस नेत्याकडे जिल्ह्याची धुरा आली, त्यांनी उत्तमरीत्या ती सांभाळली होती. परंतु अंतर्गत वादात सापडलेल्या काँग्रेसला गरज होती ती काँग्रेस वाढवणाऱ्या जिल्हाध्यक्षांची, आणि ती भूमिका चांगल्या पद्धतीने वठविली ते जिल्हा काँग्रेसचे तरुण नेतृव चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी. बाळा गावडेंच्या नेतृत्वाखाली जिल्हा काँग्रेस वाढतेय, उभारी घेत आहे. *राणे काँग्रेस मधून बाहेर पडल्यावर काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेल्या काँग्रेसच्या एका जिल्हास्तरीय पदे भूषविलेल्या पदाधिकाऱ्याने आपण जिल्ह्यातील पदे भूषविली परंतु मंत्रालयात पहिल्यांदाच पोचलो अशी प्रांजळ कबूली दिली.* जिल्हा काँग्रेसचे नेतृत्व बदलल्यानंतर सावंतवाडी तालुकाध्यक्ष थेट महसूल मंत्रांशी भेट घेऊन चर्चा करतो. त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्याला देखील आपल्या भागातील समस्या मंत्र्यांपर्यंत मांडण्याचे स्वातंत्र्य काँग्रेसमध्ये मिळाले आहे. त्यामुळे सवंग लोकप्रियतेसाठी राणे बाहेर पडल्यानंतर काँग्रेस प्रेमींना संधी मिळाल्याचे खाजगीत बोलले जात आहे.
राणे आपल्या महत्वकांक्षेसाठी काँग्रेस मध्ये एन्ट्री घेतली होती, त्यामुळे काही वर्षे जिल्ह्यातील काँग्रेस वाढलेली दिसली परंतु खऱ्या अर्थाने जेव्हा राणे काँग्रेसमधून बाहेर पडल्यावर वरवर दिसणारा फुगा फुटला आणि काँग्रेस पोखरलेली दिसून आली. परंतु कोणताही गाजावाजा न करता बाळा गावडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा काँग्रेस आज वाढत आहे, कट्टर आणि निष्ठावंत कार्यकर्ते काँग्रेसला उभारी देत आहेत. त्यामुळे सत्तेचा सहकारी असलेल्या काँग्रेसला उज्वल भविष्य असल्याचे सध्यातरी दिसत आहे.