You are currently viewing पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी CET परीक्षा होणार नाही, राज्य सरकारचा मोठा निर्णय

पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी CET परीक्षा होणार नाही, राज्य सरकारचा मोठा निर्णय

 

मंगळवारी दुपारी राज्य शिक्षण मंडळानं बारावी परीक्षेचा निकाल लावला. राज्याचा सरासरी निकाल ९९ टक्क्यांच्या वर लागला. त्यामुळे आता इतक्या विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश कसे मिळणार? अशी चर्चा सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून पदवी प्रवेशासाठी CET परीक्षा घेतली जाण्याची चर्चा सुरू होती. मात्र, अशी कोणतीही सामाईक प्रवेश परीक्षा घेतली जाणार नसून बारावीच्या निकालांच्या आधारावरच पदवी परीक्षेचे प्रवेश होणार असल्याचं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भात निर्णय जाहीर केला असल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

“कुलगुरुंसोबत झालेल्या बैठकीत आम्ही निर्णय घेतला आहे. बारावीचा बोर्डाचा जो निकाल लागला आहे, त्याच्या आधारावरच आर्ट्स, सायन्स, कॉमर्स या पारंपरिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. तुकड्यांची किंवा विद्यार्थ्यांच्या संख्येची आवश्यकता असेल, तर ३१ तारखेआधी आमच्याकडे त्यासंदर्भात प्रस्ताव सादर करावेत. पण एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी विद्यापीठानं घ्यायला हवी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत”, अशी घोषणा उदय सामंत यांनी यावेळी केली.

प्रोफेशनल कोर्सेससाठी २६ ऑगस्टपासून CET —

दरम्यान, प्रोफेशनल कोर्ससाठी २६ ऑगस्टपासून सीईटीची प्रक्रिया सुरु होईल, असं देखील उदय सामंत यांनी सांगितलं. मागील वर्षी ज्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी सीईटी नव्हती, त्या अभ्यासक्रमांना यावेळेस देखील सीईटी नसेल. इंजिनियरिंग साठी सीईटी दोन सत्रात असेल. पहिले सत्र १४ सप्टेंबरपासून, तर दुसरे सत्र १९ सप्टेंबरपासून पुढे असेल.

कोणत्या अभ्यासक्रमांसाठी CET होतील?
१. एम बी ए
२. एम सी एम
३. आर्किटेक्चर
४. बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट
५. मास्टर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट
६. बी एड.

प्रतिक्रिया व्यक्त करा