बांदा
दोडामार्ग या राज्य मार्गाची अवस्था आपल्याला दिसत नाही. सर्व सामान्य “जनता गेली खड्ड्यात'” असेच आपल्या सांबा विभागाच्या अधिकाऱ्यांना वाटते, अशा आशयाचे निवेदन डी. के. सावंत यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना दिले आहे.
जवळपास पन्नासहुन अधिक गावाना , दोन तालुक्यांना तसेच गोव्यातील महत्वाच्या औद्योगिक परीसराला जोडणाऱ्या या राज्य मार्गाची अवस्था दयनीय झाली असूनही कित्येक वर्षे दखल घेतली जात नाही.
१९ डिसेंबर १९६१ रोजी गोवा विलीनीकरण झाले व केवळ एक वर्षांत हा राज्य मार्ग तत्कालीन इमारत बांधकाम व दळणवळण मंत्री कै. मा. सा. कन्नमवार यांच्या हस्ते या रस्त्याचे व तेरेखोल नदी वरील पुलाचे उद्घाटन झाले. त्या नंतर गेल्या चार-पाच वर्षांपूर्वी पर्यंत या रस्त्याची इतकी दुरवस्था कधी झाली नव्हती.
आज अनेक उच्च शिक्षित अभियंते, आधुनिक तंत्रज्ञानाच्या या कंप्युटर युगात हा रस्ता इतका महत्वाचा असुनही ग्रामीण भागातील रस्त्यांपेक्षा वाईट परीस्थितीत आहे ह्याची कसलीही लाज आपल्या विभागाला नाही.
याचा स्पष्ट अर्थ “जनता गेली खड्ड्यात” असाच होतो. आणि म्हणूनच आम्ही कोविड १९ नियमाधीन राहून येत्या भारतीय क्रांती दिनानिमित्त या रस्त्यावरील खड्ड्यांत बसून क्रांती दिन साजरा करणार आहोत.
एकूण हा रस्ता हजारो नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याने या ठिकाणी गर्दी किंवा कोविड १९ नियम भंग झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी आपल्या विभागाच्या बेजबाबदारपणा मुळे आपल्यावर राहिल, असा इशारा डि. के. सावंत यांनी दिला आहे.