उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कोल्हापूर दौऱ्यानंतर आता खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या म्हणजेत शुक्रवारी ३० जुलै रोजी कोल्हापूरच्या पूरग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूरचा दौरा करून स्थानिक पातळीवर पूरस्थितीचा सामना करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, यासंदर्भात घोषणा केली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्री कोल्हापूरचा दौरा करत असल्यामुळे या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री पूरग्रस्त कोल्हापूरकरांसाठी कोणती मदत जाहीर करतात? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी सकाळी १० वाजता कोल्हापूरमध्ये दाखल होणार असून साडेअकरा वाजता शिरोळ-नृसिंहवाडी परिसरातील पूरग्रस्त भागाची पाहमी करतील. त्यानंतर पुढे शाहूपूर, गंगावेश, शिवाजी पूल रस्ता आणि आसपासच्या भागात पुरामुळे झालेल्या नुकसानाची ते पाहणी करतील. दुपारी दोन वाजता मुख्यमंत्री पाहणीसंदर्भात पत्रकार परिषद घेऊन यावेळी महत्त्वपूर्ण घोषणा करण्याची शक्यता आहे.
तीन दिवसांपूर्वी म्हणजेच २६ जुलै रोजी मुख्यमंत्री पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी दौरा करणार होते. रायगडमधील तळीये आणि चिपळूणची पाहणी केल्यानंतर ते सातारा, कोल्हापूरची हवाई पाहणी करणार होते. मात्र, खराब हवामानामुळे त्यांचं हेलिकॉप्टर लँड होऊ शकलं नाही. त्यामुळे त्यांचं हेलिकॉप्टर साताऱ्यात न उतरता पुण्याला माघारी गेलं.
कोल्हापूरसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात घडलेल्या वेगवेगळ्या घटनांमुळे आत्तापर्यंत २१३ जणांचा बळी घडल्याची माहिती स्टेट इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर आणि डिजास्टर मॅनेजमेंट विभागाने दिली आहे.