समाजकल्याण सभेत निर्णय
ओरोस
जिल्हा परिषदेच्या २० टक्के सेस निधी मधून मागासवर्गीयांच्या घर दुरुस्ती साठी ३५ हजार रुपये पर्यंत अनुदान देण्याची योजना आहे. तरी अतिवृष्टीमध्ये घराची पडझड झालेल्या लाभार्थींचे घर दुरुस्तीचे प्रस्ताव तात्काळ सादर करा. तसेच घरकुल दुरुस्तीसाठी असलेली अंदाजपत्रकाची अट रद्द करा. असे आदेश सभापती अंकुश जाधव यांनी समाजकल्याण समिती सभेत दिले. जिल्हा परिषद समाज कल्याण समितीची सभा सभापती अंकुश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आज येथील बॅरिस्टर नाथ पै समिती सभागृहात संपन्न झाली.
यावेळी समिती सचिव तथा समाज कल्याण अधिकारी श्याम चव्हाण, सदस्य संजय पडते, माधुरी बांदेकर, मालवण पंचायत समिती सभापती अजिंक्य पाताडे, आदींसह खातेप्रमुख अधिकारी उपस्थित होते. जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामार्फत जिल्हा परिषद सेस फंडातून मागासवर्गीयांच्या घरकुल दुरुस्तीसाठी ३५ हजार रुपये पर्यन्त अनुदान दिले जाते. या योजनेचा लाभ नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमध्ये ज्यांच्या घरांची पडझड झाली त्यांना व्हावा. यादृष्टीने अतिवृष्टी मध्ये पडझड झालेल्या घरांचे दुरुस्तीसाठीचे प्रस्ताव तात्काळ सादर करा. असे आदेश देतानाच सद्यस्थितीत घरकुल दुरुस्ती साठी अंदाजपत्रकाची अट लावण्यात आली आहे. मात्र ही अंदाजपत्रके संबंधित लाभार्थींना कोण करून देणार? अशी अडचण असल्याने लाभार्थीकडून प्रस्ताव प्राप्त होत नाहीत तरी घर दुरुस्ती साठी अडचणीची ठरणारी अंदाजपत्रकाची अट तात्काळ रद्द करा. तसेच कोरोना काळात ग्रामसभा घेणे शक्य होत नसल्याने मासिक सभेचा ठराव ग्राह्य धरण्यात यावा. असे आदेश यावेळी सभापती अंकुश जाधव यांनी दिले.
जिल्हा परिषद २० टक्के सेस मधून मागास वस्तीतील रस्ता, समाजमंदिर, स्मशान शेड दुरुस्तीसाठी ३ लाखापर्यंत असलेली मर्यादा वाढवून ती ५ लाखापर्यंत करण्यात यावी. असा ठराव आजच्या समाजकल्याण समिती सभेत घेण्यात आला. तर समाज कल्याण कडील विविध योजनांसाठी आवश्यक असलेले प्रस्ताव तातडीने सादर करा असे आवाहन समाज कल्याण सभापती अंकुश जाधव यांनी आजच्या समाजकल्याण समिती सभेत केले.